Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत मतदानाची गती मंद

मुंबईत मतदानाची गती मंद

वार्ता

पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच राज्यात याही टप्प्यात मतदानाचा वेग मंद आहे. पहिल्या दोन तासात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील दहा मतदारसंघात जेमतेम पाच टक्के मतदान झाले.

मुंबईतील सहा व ठाणे जिल्ह्यातील चार अशा दहा मतदारसंघातील १५ हजार ८७२ मतदारसंघांत मतदान सुरळीत चालू असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दोन तासात मुंबईत तीन ते पाच व ठाणे जिल्ह्यात पाच ते आठ टक्के मतदान झाल्याचे समजते.

मुंबईत सकाळी सकाळी मतदानाचा हक्क बजावणार्‍यांमध्ये उद्योगपती अनिल अंबानी, कॉंग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा, त्यांचे पिता व केंद्रीय मंत्री मुरली देवरा हे होते. उत्तर पूर्व मुंबईतून लढणारे भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी मुलूंडमधील एक मतदान केंद्रावर आई, पत्नी व मुलासह मतदान केले.

मतदानाला गालबोट
दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील गोराई येथे एका पोलिंग बुथवर असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याच्या रायफलीतून चुकून गोळी सुटल्याने त्याचा सहकारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला होता. पण पोलिसांनी तातडीने पावले उचलून स्थिती सामान्य केली. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक व कॉंग्रेसचे संजय निरूपम परस्परांसमोर आहेत.

याच मतदारसंघात कांदिवलीमध्ये मतदान होण्याच्या आदल्या रात्री पैसे वाटण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निरूपम हे पैसे वाटत असल्याचा आरोप करून कॉंग्रेसच्या एका गाडीवर दगडफेक केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi