'
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' अशी सध्या भाजपची अवस्था झाली आहे. निवडणुकीनंतर कोणत्या आघाडीला बहूमत मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाजपेयींमध्ये मात्र पुढच्या पाच वर्षानंतरच्या पंतप्रधानपदासाठीचे 'बुकींग' सुरू आहे. या पाच वर्षाचा प्रश्न अडवानींनी स्वतःचे नाव बुक करून सोडवला आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत अडवानी निवृत्त होतील, अशी अपेक्षा धरून इतरांच्या नावाचे बुकींग सुरू झाले आहे. यात अर्थातच आघाडीवर आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. वाजपेयी. अडवानी आणि आता मोदी. भाजपचा प्रवास अधिक कडवेपणाकडे चालला आहे, याचे हे लक्षण. पंतप्रधानपद अजून आवाक्यातही आलेले नसताना पक्षात पुढच्या पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली आहे. वाजपेयींनंतर अडवानी आणि त्यांच्यानंतर प्रभावशाली 'ज्येष्ठ' नेता भाजपकडे नाही. मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा ही मंडळी पोपटपंची करण्यापुरती ठीक आहेत. मते मिळविण्यासाठी नाही. नव्या पिढीत राजनाथसिंह, अरूण जेटली, सुषमा स्वराज ही मंडळी असली तरी करिश्मा त्यांच्याकडे नाही. याउलट एका राज्याचे मुख्यमंत्री असूनही नरेंद्र मोदी गुजरातबाहेरही भलतेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या लोकप्रियतेला गुजरात दंगलीची आणि कडव्या हिंदूत्ववादाची आभा असली तरीही त्यात त्यांनी गुजरातच्या कथित विकासाचा रंगही भरला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी सध्या भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही दावेदारापेक्षा मोदी नक्कीच सरस आहेत. मोदी पक्के वणिक वृत्तीचे आहेत. आपल्या नावाचे नाणे त्यांनी दुसर्या हातून खणखणीतपणे वाजवून घेतले आहे. अडवानी-मोदी हे गुरू-शिष्य असले तरी चेल्याने गुरूला मात दिली आहे. अडवानींची चर्चा कळसाला पोहोचली ती त्यांनी बाबरी मशिदीच्या कळसालाच हात घातला तेव्हा, पण मोदींनी त्यांच्या पुढे जाऊन गुजरात दंगलीवेळी प्रशासनाचे हात तेवढे मोकळे ठेवले आणि त्यांची लोकप्रियता कळसाला पोहोचली. त्यानंतर अशी काही जादुची कांडी फिरवली की गुजरातच्या विकासाची चर्चा सुरू झाली. मग 'लोकपुरूषाला' टक्कर देण्यासाठी भाजपमधील मोदी समर्थकांनी 'विकासपुरूष' असा नारा दिला. त्यातच गेल्या मकर संक्रांतीच्या दरम्यान झालेल्या 'व्हायब्रंट गुजरात' या उद्योजकांच्या परिषदेत उद्योगपतींनी मोदींचे गुणगानच केले. टाटांसारख्या ज्येष्ठ उद्योगपतींनी मोदींची भलावण केली. अंबानी बंधूंनीही त्यात कसर सोडली नाही. त्यांनी तर मोदी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. मोदींच्या मनातल्या इच्छेला या उद्योगपतींनी शब्दरूप दिले नि भाजपमध्येच या पर्यायाची चर्चा सुरू झाली. या पदासाठी डोळे लावून बसलेले अडवानी प्रचंड अस्वस्थ झाले. त्यामुळे या विषयावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया द्यायचे टाळले. निवडणुकांच्या तोंडावर राजनाथ- जेटली संघर्षानंतर भाजपमधील गटबाजीला वेगळे स्वरूप आले. या दोघांच्या संघर्षात राजनाथसिंहांच्या बाजूने असलेल्या अडवानींनी काहीही मध्यस्थी केली नाही. त्यामुळे एकट्या पडलेल्या जेटलींनी मोदींची कास धरली. पण त्यासाठी भाजपमधील पर्यायी नेतृत्वाची आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी मोदींच्या नावाची द्वाही फिरविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले गेले. अरूण शौरींनी आधी मोदींची तरफदारी करत ते पुढल्या निवडणुकीत पंतप्रधान होऊ शकतात, असे सांगून पुडी सोडून दिली. मग राजनाथसिंहांवर नाराज असलेल्या जेटलींनी या कल्पनेला उचलून धरले. वळचणीला पडलेले वेंकय्या नायडूही मोदींच्या समर्थनार्थ धावून आले. असे करता करता मोदी समर्थकांचा एक गटच भाजपमध्ये उभा राहिला. मोदींचे पारडे जड होते आहे, हे लक्षात आल्यानंतर मग गुरूने शिष्याचे पंख कापण्याचे उद्योग सुरू केले. एका पत्रकार परिषदेत भाजपमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार बरेच असल्याचे सांगून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही पंतप्रधान होऊ शकतात, असे सांगून अडवानींनी मोदींसाठी उगीचच स्पर्धा करण्याचा डाव रचला. वास्तविक. मोदींच्या लोकप्रियतेत शिवराजसिंह पासंगालाही पुरणार नाहीत हे स्पष्ट आहे. गुजरात ही संघाची प्रयोगशाळा असल्याने संघातूनही त्यांना विरोध होईल असे वाटत नाही. पण प्रश्न असा पडतो की मोदींच्या पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट होण्यामुळे भाजपचा चेहरा अधिक कडवा होत असेल तर त्याचा निवडणुकीत फायदा होईल की नुकसान? कारण हिंदूत्व हे काही मते मिळविण्याचे साधन नाही हे बाबरी मशीद जमीनदोस्त केल्यानंतरच्या निवडणुकांपासून सिद्ध झाले आहे. शिवाय मोदींनाही गुजरातमध्ये मिळणारे यश त्यांच्या हिंदूत्वापेक्षा विकासामुळे आहे हेही विसरून चालणार नाही. पण मोदी राज्याबाहेर करत असलेला प्रचार हिंदूत्वावगुंठीत आहे. त्यांना ऐकायला गर्दीही होते. टाळ्याही मिळतात. पण म्हणून मते मिळतील असे नाही. पण तरीही गुजरातच्या विकासाची जी चर्चा गेल्या काही दिवसापासून विशेषतः नॅनो प्रोजेक्ट आल्यापासून सुरू झालीय तिचा काही परिणाम नक्कीच पडू शकतो. 'लोहपुरूषानंतर' विकासपुरूष ही प्रतिमा स्थापित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मध्यमवर्ग या प्रतिमेला नक्कीच भुलू शकतो. भाजपची प्रतिमाही अलीकडे हिंदूत्ववादी पक्षापेक्षा मध्यमवर्गीयांचा कैवारी अशी झाली आहेच. मोदी याच वर्गाचा चेहरा ठरू शकतात. पण 'आम आदमी' त्यांना भुलेल असे वाटत नाही.
'एनडीए'तील पक्षांना मोदींची कडवी प्रतिमा त्रासदायक ठरू शकते. आत्ताही अडवानी आल्यानंतर चंद्राबाबू नायडूंपासून, जयललितांपर्यंत अनेक जण साथ सोडून गेले आहेत. ओरिसातील दंगलखोर हिंदूत्ववाद्यांमुळे नुकतीच नवीन पटनाईक यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. आता गुजरात दंगलीचा डाग असलेले मोदी भाजपचा चेहरा झाले तर किती घटक पक्ष सोडून जातील हे सांगता येणार नाही आणि आघाडीशिवाय केंद्रात सत्ता स्थापन करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. हे पाहता मोदी आघाडीच्या घटक पक्षातही प्रिय ठरू शकतील असे वाटत नाही.
खुद्द भाजपमध्ये काय होईल याचाही विचार व्हायला हवा. मोदी सध्या तरी भाजपपेक्षा मोठे ठरले आहेत. निदान गुजरातमध्ये तरी. गुजरातमध्ये भाजपचा मोदींशिवाय दुसरा कोणताही नेता नाही. मोदींनी निवडणुका जिंकल्या त्याही स्वबळावर. विकास आणि हिंदूत्व यांचे कॉम्बिनेशन असलेले 'मोदीत्व' च गुजरातमध्ये चालले. त्यामुळे पक्षातही मोदी कुणालाच विचारत नाहीत. असे असताना मोदींना प्रोजेक्ट करणे भाजप नेत्यांना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारे ठरू शकते. शिवाय त्यांची काम करण्याची शैली एकचालकानुवर्ती आहे. हे पाहता ते इतरांना किती संधी देतील याचीही शंका आहे. त्यांचे नेतृत्व मान्य करणे म्हणजे त्यांचे मांडलिकत्व स्वीकारण्यासारखे होईल. पक्षातील मवाळपंथीयांना फारसे महत्त्व राहिल असे वाटत नाही. पण त्याचवेळी मोंदींना दुर्लक्षित करणेही परवडणारे नाही. दोनदा गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पंतप्रधानपदाचेच वेध लागणार हे नक्की. त्यामुळे दिल्लीकडे निघालेल्या मोदींना भाजप गुजरातमध्येच रोखून धरणार की दिल्लीचा मार्ग निर्वेध करणार हे पुढच्या पाच वर्षात ठरेल.