लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणार्या लोकसभेत जाण्यासाठी सध्या गुंडांची गर्दी झाली आहे. कॉंग्रेस- भाजप या राष्ट्रीय पक्षांनीही अनेक गुंडांना तिकिट देऊन त्यांना लोकसभेच्या रांगेत उभे केले आहे. पहिल्या तीन टप्प्यात असलेल्या ५५७३ उमेदवारांपैकी तब्बल एक षष्ठांश उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे लक्षात आले आहे.
नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या दोन संघटनांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. साडेपाच हजारांपैकी तब्बल ९०९ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे या गुंडांना सर्वच पक्षांचा 'आशीर्वाद' आहे. 'आम आदमी'ची कॉंग्रेस गुंडांना तिकीट देण्यात आघाडीवर असून या पक्षाने असे शंभर उमेदवार उतरवले आहेत. तर या 'स्पर्धेत' किंचित मागे पडलेल्या भाजपचे ९८ उमेदवार गुन्हेगारीचा कलंक भाळी 'मिरवणारे' आहेत.
दलित ते सर्वजन असा प्रवास केलेल्या मायावतींचा बहूजन समाज पक्षही यात मागे नाही. या पक्षाने ८८ असे उमेदवार उतरवले आहेत आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाने ३९ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना तिकिट देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हे दाखवून दिले आहे.
या ९०९ उमेदवारांपैकी ४०१ जणांवर अतिशय गंभीर असे गुन्हे आहेत. या आकडेवारीत अर्थातच बिहारने आघाडी घेतली आहे. बिहारमध्ये १७५ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर बिहारींना हाकलण्याचे 'राज'कारण रंगलेल्या महाराष्ट्रात १४४ उमेदवारांवर काही ना काही गुन्हे आहेत. मग नंबर लागतो तो उत्तर प्रदेशचा. या राज्यात १२२ तर झारखंडमध्ये ५१ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
गुन्हेगारीत 'श्रीमंत' असलेला कॉंग्रेस पक्ष करोडपती उमेदवारांमध्येही 'श्रीमंत' आहे. पक्षाचे २०२ उमेदवार करोडपती आहेत. शेठजींचा पक्ष असलेला भाजप बराच मागे पडला असून त्याचे १३९ उमेदवार कोट्यधीश आहेत. मायावतींच्या बसपचे ९५ तर सपाचे ४१ उमेदवार करोडपती आहेत.