राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अखेर यावेळीही भंगले. 'युपीए' सत्तेपर्यंत जाणार नाही, अशी अटकळ बांधून पवारांनी पंतप्रधानपदासाठी लॉबिंग सुरू केले होते. अनेक पक्षांच्या नेत्यांकडून आपले नाव पंतप्रधानपदासाठी वदवूनही घेतले होते. पण आजच्या अनपेक्षित निकालाने पवारांना धक्का बसला आहे.
कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची इच्छा पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर सोनियांच्या विदेशी मुद्यावर पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाची वेगळी चूल मांडली. पण स्वतंत्र पक्ष स्थापन करूनही आतापर्यंत त्यांना कधीही पंतप्रधानपदापर्यंत जाता आले नाही. देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांच्याप्रमाणे छोट्या पक्षांना महत्त्व आल्यास आपलाही नंबर कधी तरी या पदासाठी लागेल अशी त्यांना अपेक्षा होती. यावेळी तशी संधीही असल्यासारखे वाटत होते. पण तसे झाले नाही.
पवारांनी 'ह्रदयात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र' अशी स्लोगन घेऊन यावेळची निवडणुकीत महाराष्ट्रात लढवली होती. त्यातच मराठी माणूस पंतप्रधान व्हायला हवा, असे भावनिक आवाहनही जोडले होते. त्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्नही झाला. बाहेरच्या राज्यात जयललिता, बिजू पटनायक, चिरंजीवी, अमरसिंह यांचा पाठिंबाही मिळवला. पण इलेक्ट्रॉनिक यंत्रातून बाहेर आलेल्या मतदानाच्या आकड्यांनी पवारांची आकडेमोड धुळीस मिळवली आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगले.