अटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची जादू होती. त्यांच्या प्रेमामुळेच मी राजकारणात आलो, अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितली.
वाजपेयींच्या आठवणींना उजाळा देताना धर्मेंद्रना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात अटलजींना महत्त्वाचे स्थान होते. त्यांचे निधन हा माझ्यासाठी धक्का आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी राजकारणात सक्रिय झालो. त्यांच्याकडून बोलावणे आले तेव्हा त्यांच्याशी काय बोलावे हेच मला सुचत नव्हते. जेव्हा कधी मी त्यांच्याकडे जायचो, तेव्हा उभे राहून मला मिठी मारायचे. त्यांच्या कविता वाचून दाखवायचे. त्यांच्यासमोर मी निःशब्द होऊन जायचो. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ते बोलायचे, मी फक्त ऐकत बसायचो.
वाजपेयींचे देशावर फार प्रेम होते. देशातील सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावे अशी त्यांची इच्छा होती. या भावनेतूनच भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असेही धर्मेंद्र म्हणाले.