सर्व पशु-पक्ष्यांमध्ये रंग पाहण्याची आणि त्यांची ओळख करण्याची सर्वोत्तम क्षमता गरुडामध्ये असते. त्याचा हाच गुण त्याला आपल्या शिकारीची ओळख करून तिच्यावर झडप टाकण्यास यश मिळवून देतो. एका अध्ययनातून हे समोर आले आहे. स्वीडनच्या लुंड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनातून संकटात असलेल्या पक्ष्यांना पवन चक्की व विजेच्या तारांपासून वाचविण्यात मदत मिळेल. लुंड युनिव्हर्सिटीतील जीवशास्त्रज्ञ अल्मट केल्बर यांनी सांगितले की, शिकारी पक्ष्यांची दृश्य क्षमता मानवाच्या तुलनेत चांगली असते. त्यामुळे दूरवरून आपली शिकार पाहून पकडू शकतात. त्यात रंगांचेही आपले महत्त्व असते. साधारणपणे डोळ्यांचा आकार पाहण्याची क्षमता निश्चित करतो. जेवढे मोठे डोळे, तेवढी पाहण्याची क्षमता जास्त. डोळ्यांचा आकार शारीरिक आकारावर अवलंबून असतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, पक्ष्यांमध्ये खराब दृश्य क्षमतेमुळे वस्तूंमध्ये फरक करण्यात समस्या येते. पक्ष्यांची ही क्षमता मानवापेक्षा दसपटीने कमी असते. समजा एखाद्या वस्तूची ओळख होत नसेल व तिचा रंगही अन्य वस्तूंसारखा असेल तर पक्ष्यांना ती ओळखण्यास समस्या येईल. मात्र त्या वस्तूचा रंग आसपासच्या वस्तूंपेक्षा वेगळा असेल तर गरुड तिला मानवी दृष्टीपेक्षा दहापट जास्त अंतरावरून ओळखेल.