डाटा लीक वादात अडकलेली ब्रिटिश संशाेधन संस्था केम्ब्रिज अॅनालिटिक या कंपनीचे माजी कर्मचारी आणि व्हिसलब्लोअर (कंपनीच्या चुकीच्या धोरणांची माहिती देणारा) क्रिस्टोफर वायली यांनी ब्रिटिश संसदीय समितीसमोर सांगितले की, अॅनालिटिकाने भारतात खूप मोठ्या प्रमाणात काम केले. काँग्रेसनेही या कंपनीची सेवा घेतली होती. ब्रिटिश संसदेच्या डिजिटल, कल्चर, मीडिया आणि स्पोट्स समितीसमोर वायली यांनी सांगितले, “यूजर्सबाबत फेसबुकची बाजारपेठ पाहिली तर भारत अव्वल स्थानी आहे. या देशात राजकीय वाद आणि अस्थैर्याच्या दृष्टीने प्रचंड संधीही आहेत. केम्ब्रिज अॅनालिटिकाचे भारतात कार्यालय पण होते. कंपनीने या देशात मोठे प्रोजेक्ट केले. राष्ट्रीय पातळीवरचे आठवत नाही, मात्र प्रादेशिक स्तरावर बरेच प्रकल्प मला आठवतात.’
अॅनालिटिकावर अमेरिकेतील ५० लाख फेसबुक यूजर्सचा डाटा चोरून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डोनॉल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचा आरोप आहे. यानंतर काँग्रेसने २०१९ची निवडणूक जिंकण्यासाठी अॅनालिटिकाची सेवा घेतली असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला होता.