सर्वाधिक मोबाईल उत्पादन देशांच्या यादीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्हिएतनामला भारताने मागे टाकलं. इंडियन सेल्युलर असोसिएशनने हा दावा केला आहे.
इंडियन सेल्युलर असोसिएशनचे (आयसीए) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "आपणास कळवण्यात आनंद होतो आहे की, भारत सरकार, आयसीए आणि फास्ट ट्रॅक टास्क फोर्सच्या (एफटीटीएफ) अथक प्रयत्नांनंतर भारत सर्वाधिक मोबाईल उत्पादक देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे."
आयसीएने मोबाईल उत्पादनासंदर्भातील चीन आणि व्हिएतनाममधील संस्थांचा हवाला दिला आहे. आयसीएच्या आकडेवारीनुसार, भारतात 2014 साली मोबाईल फोनचे 30 लाख यूनिट उत्पादन झाले, तर 2017 साली 1.1 कोटी यूनिट उत्पादन झाले. मोबाईल आयात आकडेवारीही निम्म्यापर्यंत खाली आली आहे. फास्ट ट्रॅक टास्क फोर्स म्हणजेच एफटीटीएफने 2019 पर्यंत मोबाईल फोन उत्पादनासाठी 50 कोटी यूनिटचं ध्येय ठेवण्यात आले असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.