Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

वादात सापडेल्या साहित्यीक नयनतारा सहगल यांचे नेमके काय आहे भाषण नक्की वाचा

nayantara sehgal controversial speech
यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची आयोजक संस्था आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यातील तीव्र मतभेदांची परिणती रविवारी संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द  केले असून , हे मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे.संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे कळवले आहे. त्यांचे भाषण हे कारणीभूत आहे असे समोर आले असून मात्र ठाम पणे नेमके कारण कोणीही देण्यास समोर आले नाही.
 
बीबीसी मराठी ने हे भाषण प्रसिद्ध केले असून त्यातील काही महत्त्वाचा भाग आम्ही वाचकांसाठी देत आहोत. भाषण खालील प्रमाणे आहे.
 
माझ्याकरता हा एक भावनिक क्षण आहे. मला असे वाटते आहे की, ज्यांचे नाव आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहे ते मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणारे महादेव गोविंद रानडे (माझे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे त्यांचे जवळचे स्नेही आणि सहकारी होते), या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले सर्व थोर मराठी साहित्यिक आणि ज्यांच्या लेखनामुळे भारतीय साहित्य नावाचे महान सृजनात्मक कार्य समृद्ध झालेले आहे, असे सर्व संमेलनांमध्ये सहभागी झालेले सगळेच लेखक, या सर्वांच्या छायेत मी आज उभी आहे.माझ्याकरता हा क्षण भावनिक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे माझे वडील रणजीत सीताराम पंडित यांच्याकडून माझे स्वतःचे महाराष्ट्राशी असलेले नाते. त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते.संस्कृत विद्वानांच्या एका नामांकित कुटुंबातले माझे वडील स्वतःही संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी 'मुद्राराक्षस', कालिदासाचे 'ऋतुसंहार' आणि 'राजतरंगिणी' या तीन अभिजात संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते. त्यांपैकी 'राजतरंगिणी' हा ग्रंथ म्हणजे कल्हण पंडिताने बाराव्या शतकामध्ये लिहिलेला काश्मिरी राजांचा इतिहास आहे. माझ्या वडिलांना या ग्रंथाचे विशेष आकर्षण होते, कारण संस्कृत आणि काश्मीर हे दोन विषय त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे होते.ब्रिटिश अंमल असताना त्यांना ज्या अनेकवेळा तुरुंगात जावे लागले होते, त्यांपैकी दोन तुरुंगवाऱ्यांमध्ये मिळून त्यांनी हे भाषांतर केले आणि ते आपले काश्मिरी श्वशुर पंडित मोतीलाल नेहरू यांना अर्पण केले. हे भाषांतर प्रकाशित झाले, तेव्हा त्यांचे मेव्हणे, जवाहरलाल नेहरू यांनी त्याची प्रस्तावना लिहिली.  डॉ. अरुणा ढेरे आणि श्री. प्रशांत तळणीकर यांनी अतिशय कष्टपूर्वक हा प्रदीर्घ इतिहास माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये आणला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक ऋणी आहे. मी खात्रीने सांगू शकते की, इतर कशाहीपेक्षा माझ्या वडिलांना या गोष्टीचा मनस्वी आनंद झाला असता. 
 
माझ्या आई आणि वडिलांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतला होता. या काळात माझी आई विजयालक्ष्मी पंडित हिला तीन वेळा, तर माझ्या वडिलांना चार वेळा तुरुंगवास घडला होता. वडिलांच्या चौथ्या तुरुंगवासाच्या वेळी बरेलीतल्या तुरुंगामध्ये माझे वडील गंभीर आजारी पडले. त्या तुरुंगातले एकूण वातावरण आणि तिथली सर्व व्यवस्था केवळ भयानक होती.
 
वडील आजारी पडल्यावर ना तर त्यांना कुठलेही वैद्यकीय उपचार देण्यात आले, ना त्यांच्या आजाराच्या नेमक्या स्वरुपाची आणि तीव्रतेची माझ्या आईला कल्पना देण्यात आली. पण असे असूनही माझ्या वडिलांनी सुटकेची याचना करण्यास नकार दिला. अखेर जेव्हा माझ्या आईला त्यांच्या अवस्थेबद्दल कळवण्यात आले, तेव्हाही तिला त्यांच्याशी फक्त वीस मिनिटांची भेट मंजूर करण्यात आली. ही भेटही नियमाप्रमाणे तुरुंग अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या नजरेखाली झाली. या नियमांमध्ये राजकीय बंद्यांना त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीसोबत एकांत मिळण्याची तरतूद नव्हती. भेटीसाठी म्हणून माझ्या वडिलांना जेव्हा तिथे स्ट्रेचरवर आणण्यात आले, तेव्हा माझ्या आईला प्रचंड धक्का बसला.
 
डोक्याचा संपूर्ण गोटा केलेला आणि शरीरावर मांस जणू नाहीच, अशी त्यांची अवस्था होती. त्यांना पाहताच आईला रडू फुटले, पण तुरुंगाधिकाऱ्यासमोर तिने अश्रू ढाळलेले वडिलांना अजिबात आवडले नसते हे ठाऊक असल्याने तिने महत्प्रयासाने स्वतःच्या अश्रुंना बांध घातला. सुटकेची याचना करून सरकारचे उपकार शिरावर न घेण्यामागची त्यांची भूमिका त्यांनी तिच्याजवळ स्पष्ट केली.
 
ते म्हणाले, "गांधी आणि नेहरू या सिंहांच्या साथीने मी लढलो आहे. मग आता मी (भित्र्या) कोल्ह्याप्रमाणे वागावे असे तुला वाटते का?" त्यांच्या निर्धारामध्ये बदल होणार नाही हे ठाऊक असल्यामुळे तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि त्यांचा हात हातात घेऊन ती त्यांच्या स्ट्रेचरजवळ बसून राहिली. मग तिने त्यांना घरची, मुलांची खबरबात सांगितली आणि त्यांच्या आवडत्या बागेत सध्या काय-काय फुलले आहे तेही सांगितले.
 
अंतिमतः सरकारने त्यांची सुटका केली, पण ती जणू मरण्यासाठीच, कारण जेमतेम तीनच आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला. नंतर अनेक वर्षांनी, स्वातंत्र्य मिळाल्यावर, माझी आई भारताची ब्रिटनमधील उच्चायुक्त असताना एकदा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यासोबत भोजन घेत असताना चर्चिल तिला म्हणाले, "तुमच्या पतीचा जीव आम्हीच घेतला, नाही?" त्यांचे हे कबुलीजबाबासम उद्गार ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले होते.
 
१९४०च्या दशकात तुमच्यापैकी बहुतेकांचा जन्मदेखील झालेला नसेल. तुम्ही सगळे एका स्वतंत्र देशात जन्मले आणि मोठे झालेले आहात, म्हणून मी तुम्हाला ही व्यक्तिगत कहाणी सांगितली. त्यावरून तुम्हाला त्या काळातल्या धैर्य आणि शिस्त यांची, तसेच देशाच्या स्वातंत्र्याकरता जे स्त्री-पुरुष लढले, त्यांच्या निर्धाराची कल्पना यावी. त्या महान लढ्यामध्ये ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि स्वातंत्र्याची तीव्र आस असल्यामुळे सर्व प्रकारे प्रचंड दुःखही भोगले, अशा ज्ञात-अज्ञात, आबालवृद्ध, हजारो, लाखो भारतीयांमध्ये माझे आईवडील होते. मला तुम्हाला विचारायचे आहे, आज आपल्यामध्ये स्वातंत्र्याची तीच आस आहे का? आपल्या आधी होऊन गेलेल्या, भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरुषांचे नाव सांगण्यास आपण पात्र आहोत का?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये - जयंत पाटील