नवीन पिढी पत्रलेखनाला प्रवृत्त व्हावी या हेतूने टपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार व ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
रवींद्रनाथ टागोर यांच्या देशभक्तीपर साहित्यावर आधारित ‘मेरे देश के नाम खत’या विषयावर हिंदी, इंग्रजी व मराठीमध्ये पत्र लिहिता येईल. १८ वर्षांखालील गट व १८ वर्षांवरील गट अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. आंतर्देशीय पत्रावर लिहिल्या जाणाऱ्या पत्रांना ५०० शब्दमर्यादा, तर लिफाफ्याद्वारे पाठवण्यात येणाऱ्या पत्रांना १ हजार शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पोस्टाच्या राज्य-सर्कल स्तरावर प्रथम विजेत्याला २५ हजार रुपये, द्वितीय विजेत्याला १० हजार व तृतीय विजेत्याला ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. प्रत्येक राज्य-सर्कल स्तरावरील पहिल्या तीन विजेत्यांची पत्रे राष्ट्रीय स्तरावर निवडण्यात येतील व त्यामधील प्रथम विजेत्याला ५० हजार, द्वितीय विजेत्याला २५ हजार व तृतीय विजेत्याला १० हजार रपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. ही पत्रे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई या पत्त्यावर पाठवायची आहेत. गतवर्षी राज्यात ६१ हजार जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.