काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा फैसला आज होणार आहे. जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणात सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे.
दुसरीकडे सलमान खानच्या सुटकेसाठी त्याची जवळची मैत्रिण, सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सिद्धिविनायकाच्या चरणी आली. कतरिना सलमानची बहीण अर्पितासोबत बाप्पाच्या दर्शनाला आली होती. कतरिना आणि अर्पिता यांनी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. काळवीट शिकार प्रकरणातून सलमानची निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी दोघींनी बाप्पासमोर हात जोडल्याचं म्हटलं जातं.
ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.