आईची माया काही वेगळीच असते याचा प्रत्यय तेलंगणधील एका घटनेमुळे समोर आला आहे. सध्या देशभरात लॉकडाउन असल्यामुळे आपल्या अडकलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी महिलेने स्कुटीवरुन 1400 किमीचा प्रवास केला.
48 वर्षीय महिला तेलंगणमधील रहिवासी असून मुलगा आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे अडकला होता. पोलिसांची परवानगी घेऊन रजिया बेगम यांनी सोमवारी सकाळी प्रवास सुरु केला होता. नेल्लोरपर्यंत एकटीने प्रवास करुन बुधवारी संध्याकाळी मुलाला सोबत घेऊन त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. तीन दिवस 1400 किमीचं अंतर गाठत रजिया बेगम आपल्या मुलाला घरी घेऊन आल्या.
रजिया बेगम सरकारी शाळेत मुख्याध्यापिका आहेत. त्यांच्या पतीचं 15 वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्या आपल्या दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा 19 वर्षीय मुलगा निजामुद्दीनची 12 मार्च रोजी आपल्या मित्राला सोडण्यासाठी नेल्लोर येथे गेला होता. यानंतर तो तिथेच राहिला होता. तितक्यात लॉकडाउन जाहीर झाला तो अडकला. यामुउळे आईला रुखरुख लागू लागली. मग त्यांनी स्वत: जाऊन मुलाला परत आणण्याचा निर्णय घेतला.