Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशी बनवाबनवी व नौटंकी चालणार नाही, अजित पवारांनी दिला विरोधकांना सज्जड दम

ajit panwar
, शनिवार, 11 मे 2024 (00:38 IST)
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना- भाजप -राष्ट्रवादी- मनसेआरपीआय -रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. या वेळी त्यांनी म्हटले, पिंपरीत आमदाराच्या मुलीच्या स्वागत समारंभात माझं लक्ष नसताना विरोधी आघाडीच्या उमेदवाराने पाय पकडून आशीर्वाद घेण्याचे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची बनवाबनवी केली असून अशी बनवाबनवी व नौटंकी चालणार नाही. असा सज्जड दम त्यांनी थेट विरोधकांना दिला. 

मावळात धनुष्यबाणानेच काम करायचे अशी भूमिका स्पष्ट असताना कोणी गडबड करताना दिसले तर त्या कार्यकर्त्याचे कामच करेन. या शब्दांत त्यांनी थेट विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. 
या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  
 
या वेळी त्यांनी सभेतून बोलताना माविआच्या उमेदवाराचे नाव न घेता चांगलेच धारेवर धरले आणि ते म्हणाले, आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाप्रीत्यर्थ स्वागत समारंभासाठी गेलो असता माझे त्याच्याकडे लक्ष नसताना त्याने माझे पाय धरून सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करत जणू मी त्याला आशीर्वाद देत असल्याची बनवाबनवी केली. अशी बनवाबनवी किंवा नौटंकी खपवून घेतली जाणार नाही. या शब्दात त्यांनी माविआच्या उमेदवाराला थेट खडसावले.

एक घाव दोन तुकडे असा माझा स्वभाव आहे. मावळात फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालवायचे अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तालुक्यातील वरिष्ठ नेते काम करत आहे मात्र खालच्या फळीतील काही कार्यकर्त्ये गडबड करताना दिसत आहे. वेळीच त्यांनी सुधारणा करावी अन्यथा त्यांचे कामच करेन. अशा शब्दात पवारांनी खडसावले.यंदाची लोकसभेची निवडणूक निवडणूक देशाची असून नात्यागोत्याची नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गेली 10 वर्षे विकास कामे झाली त्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केंद्राकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्यासाठी मावळातून श्रीरंग बारणे खासदार होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Edited By- Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia - Ukraine War: युक्रेनियन ड्रोनने रशियनतेल डेपोवर हल्ला केला