Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड लोकसभा मतदारसंघ : मुंडेंच्या मतदारसंघात आरक्षणाचा मुद्दा तापणार का?

election
, सोमवार, 11 मार्च 2024 (15:25 IST)
लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वेगानं वाहू लागले आहेत. देशभरात राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातही ती तयारी सुरू आहे, पण अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवारीचं चित्र स्पष्ट केलेलं नाही.
 
चित्र स्पष्ट व्हायचं असलं तरी राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागून असलेले अनेक लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सातत्यानं पाहायला मिळाल्या. मुंडे बंधू-भगिणींच्या संघर्षामुळंही हा मतदारसंघ चर्चेत होता.
 
भाजपच्या प्रीतम मुंडे या ठिकाणच्या विद्यमान खासदार आहेत. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ देत धनंजय मुंडेही भाजपबरोबर गेले. त्यामुळं याठिकाणी रंजक समीकरण पाहायला मिळणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात जम बसवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासमोर भाऊ धनंजय मुंडेंचं मोठं आव्हान होतं. पण आता दोघे राजकीयदृष्ट्या तरी एकत्र आहेत.
 
उमेदवारीचं चित्र स्पष्ट होईपर्यंत काहीही नक्की नसलं तरी मुंडेंच्याच घरात उमेदवारी राहणार अशा चर्चा आहेत. आता भाजप पंकजा मुंडेंना यावेळीही काही नवा धक्का देणार का? याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे.
 
बीड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हणता येईल. कारण 2004 चा अपवाद वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणी मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे.
 
पण हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच भाजपचाच गड होता असं मात्र नाही. या मतदारसंघावर 1995 पर्यंत काँग्रेसची पकड असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या केसरबाई क्षीरसागर इथून तीन वेळा लोकसभेत पोहोचल्या.
 
त्याचबरोबर 1952 च्या पहिल्या निवडणुकीत पिपल्स डेमोक्रेटिक फ्रंट, 1967, 1977 मध्ये माकप आणि 1989 जनता दलाच्या उमेदवारांना मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
पण नंतरच्या काळात जयसिंगराव गायकवाड आणि त्यानंतर दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची मुळं या मतदारसंघामध्ये घट्ट केली.
 
त्यानंतर म्हणजे 1996 पासून तो भाजपचा बालेकिल्ला ठरला. जयसिंगराव गायकवाड, गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत बीडचं प्रतिनिधित्व केलं.
 
2019 ला काय घडलं?
बीड लोकसभा मतदारसंघावर गोपीनाथ मुंडे यांचं कायम वर्चस्व पाहायला मिळालं. 2009 आणि 2014 मध्ये ते लोकसभेत विजयी झाले. 2014 मध्ये मंत्री बनले.
 
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवत विक्रमी विजय मिळवला.
 
2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. 2014 प्रमाणेच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे विजयी झाल्या.
 
पण त्यांची मतांची आघाडी खूपच घटल्याचं पाहायला मिळालं. 2014 च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास 7 लाखांची आघाडी होती. पण 2019 मध्ये 1 लाख 68 हजारांची आघाडी मिळाली.
2019 मध्ये प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं 90 हजारावर मतं घेतली होती.
 
धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. त्यामुळं मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला होता.
 
मुंडे वि. मुंडे ते सत्तेत एकत्र
बीड लोकसभा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी या एकापाठोपाठ आश्चर्याचे धक्के देणाऱ्या होत्या.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर असलेली सगळीच समीकरणं आता बदलली आहेत.
 
बीडमधलं राजकारण कायम मुंडे नावाभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. 2019 मध्ये तर मुंडे विरुद्ध मुंडे असा प्रचंड संघर्ष होता.धनंजय मुंडे आणि पंकजा आमने-सामने होते. त्यात विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजांना पराभूत केलं. त्यामुळं संघर्ष आणखी शिगेला पोहोचला.
 
पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर पक्षातूनही बाजूला केलं जात असल्याची चर्चा होती. विधान परिषदेवरही संधी मिळाली नाही. त्यांना पक्षानं संघटनात्मक कामात गुंतवलं. पण पंकजा मुंडेंची वक्तव्यं आणि विशेषतः दसरा मेळाव्यातील भूमिका यावरून त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चाही होती.
 
पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच धनंजय मुंडेंचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. पण आता अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर गेल्यानं पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकत्र काम करण्याशिवाय पर्याय नाही.
 
त्यात गेल्या काही महिन्यांमध्यं मुंडे भावा बहिणींमधलं नातं सुधारल्याचंही अनेक जाहीर कार्यक्रमांत किंवा खासगी भेटींवरूनही पाहायला मिळालं. त्यामुळं यावेळी धनंजय मुंडे स्वतः बहिणीसाठी प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे.
 
इतर पक्षांचा विचार करता भाजप आणि राष्ट्रवादी शिवाय इतर पक्षांची इथं फारशी शक्ती नाही. हे दोन्ही पक्ष आता एकत्र आहेत. त्यामुळं शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांमध्ये याठिकाणी शक्ती लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
अद्याप नावं जाहीर झाली नसली तरी भाजपकडून पुन्हा प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सुशिला मोराळे आणि नरेंद्र काळे अशी नावं चर्चेत आहेत. शिवाय रजनी पाटील यांच्या नावाचीही कुजबूजही सुरू आहे.
 
हे मुद्दे ठरू शकतात निर्णायक
बीड लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसमोर असलेल्या समस्या किंवा मुद्द्यांची यादी तशी मोठी आहे. त्यातील निवडणुकीवर परिणाम करणारे मुद्देही कमी नाहीत.
 
या ठिकाणी आरक्षण आंदोलनानंतर मराठा विरुद्ध कुणबी हा मुद्दा सर्वाधिक निर्णायक ठरू शकतो. मनोज जरांगेंचं आंदोलन आणि त्यादरम्यान बीडमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनी बीडमधलं वातावरण सध्या तापलेलं आहे.
 
मराठा आरक्षण आणि या आंदोलनादरम्यानची कारवाई आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे, हे सगळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचे विषय आहेत. त्यामुळं ते निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात.
बीडमधील सर्वात प्रलंबित आणि सर्वात चर्चित मुद्दा म्हणजे रेल्वे. बीडमध्ये रेल्वे कधी येणार हा प्रश्न बीडचा जवळपास प्रत्येक नागरिक विचारत असल्याचं पाहायला मिळतो.
 
रेल्वेनं जिल्ह्याचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात, असं नागरिकांचं मत आहे.
 
त्याचबरोबर शेतकऱ्यांचे हमीभाव, सोयाबीनचे दर हे प्रश्नही आहेतच. त्याचबरोबर ऊसतोड मजुरांचा मुद्दाही बीडमध्ये अनेक दशकांपासूनचा आहे.
 
पाणी आणि वॉटरग्रीडचा प्रलंबित मुद्दाही महत्त्वाचा आहे. हे सर्वच प्रश्न या निवडणुकीत बीड मतदारसंघामध्ये निर्णायक ठरू शकतात.
 
एकूणच यावेळी मतदारसंघामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळणार नाही असं दिसत आहे. शिवाय पंकजा मुंडेंनीही कंबर कसल्याचं नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा बीडमधून लोकसभेत मुंडेंच जाणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध गायक सिद्दू मुसेवालाची आई हॉस्पिटलमध्ये दाखल