भाजपाकडून देशभरातील एकूण ७२ उमेदवारांची नावं आज प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. भाजपाने काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत. तर राज्यातील काही बड्या चेहऱ्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, मुंबई उत्तर येथून पियूष गोयल, जळगावमधून स्मिता वाघ आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ ही भाजपाच्या यादीमधील लोकसभेला उमेदवारी देण्यात आलेली प्रमुख नावं आहे.
आज प्रसिद्ध केलेल्या २० उमेदवारांच्या यादीमध्ये भाजपानं नागरपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे. तर जालना येथून पक्षाने रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी दिली आहे. सांगलीमधून संजयकाका पाटील आणि अहमदनगरमधून सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबरोबरच वर्धा येथून रामदास तडस, नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, नंदूरबारमधून हीना गावित, धुळे येथून सुभाष भामरे, रावेर येथून रक्षा खडसे, भिवंडीतून कपिल पाटील, दिंडोरी येथून भारती पवार, लातूरमधून सुधारक शृंगारे आणि माढा येथून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र काही मतदारसंघामध्ये भाजपानं उमेदवार बदलले आहेत. राज्यातील आघाडीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी बीडमधून उमेदवारी दिली आहे. चंद्रपूरमधून ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय मुंबई उत्तरमधून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना आणि मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. जळगावमध्येही भाजपानं उमेदवार बदलला असून, तेथे उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोला येथून भाजपाकडून संजय धोत्रे यांच्या जागी अनूप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यातील महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र तरीही भाजपानं आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे जे मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला आले आहेत. तसेच २०१९ मध्ये भाजपानं जिथून निवडणूक लढवली होती. अशाच मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा आज भाजपाकडून करण्यात आली आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor