भारतामध्ये कदाचित असा एखादाच मतदारसंघ असावा की ज्याचं प्रतिनिधित्व बहुतेक सर्व प्रकारच्या पक्षांनी केलं असेल. मुंबईतला उत्तर मध्य मतदारसंघ असाच आहे. उजव्या, डाव्या, मध्यममार्गी समजल्या जाणाऱ्या सर्व पक्षांना या मतदारसंघात संधी मिळालेली आहे.
या मतदारसंघात समाजातल्या विविध स्तरातील, विविध आर्थिक-सामाजिक स्तरातील लोक राहातात. तसेच कदाचित सर्वात जास्त धार्मिक विविधताही याच मतदारसंघात दिसून येईल. एकीकडे बीकेसीसारखं आर्थिक केंद्र, परदेशी कंपन्या आणि बँकांच्या कार्यालयाचं स्थान तर दुसरीकडे झोपडपट्टी इतकी मोठी विविधता एकाच मतदारसंघात दिसून येते.
चाकरमानी, उद्योजक, फिल्म क्षेत्रात काम करणारे लोकही इथं राहातात आणि इथं कोळीवाडेही आहेत. मेट्रोची सुरू असलेली कामं, नवे रस्ते, नव्या पुलांची काम या मतदारसंघात सुरू असल्यामुळे भविष्यातले अनेक प्रश्न सुटणार असले तरी या काळात प्रदुषण, वाहतूक कोंडी अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
मतदारसंघाची रचना
या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये विलेपार्ले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचे पराग अळवणी करतात. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलिप लांडे, कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचेच संजय पोतनिस विजयी झाले होते.
वांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशीष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. यामुळे एक अपवाद वगळता विधानसभा निवडणुकांत या मतदारसंघांवर युतीचं प्राबल्य दिसून येतं.
आजवर कोणी प्रतिनिधित्व केलं?
या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी अनेक नेत्यांना, अनेक पक्षांना मिळाली आहे. 1952 साली काँग्रेसचे नारायण काजरोळकर आणि विठ्ठल गांधी या मतदारसंघाचे खासदार झाले.
त्यानंतर 1957 साली भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीपाद अमृत डांगे आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे गोपाळ माने यांना संधी मिळाली.
1962 साली काजरोळकर विजयी झाले. त्यानंतर 1967 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी रामचंद्र भंडारे या मतदारसंघाचे प्रतिनिधी झाले.
1971 सालीही त्यांचा विजय झाला. परंतु 1973 साली त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांना हे पद सोडावं लागलं आणि मग पोटनिवडणुकीत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे विजयी झाल्या.
1977 साली काँग्रेसविरोधी लाटेत कम्युनिस्ट पार्टीच्या अहिल्या रांगणेकर, 1980 साली जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते यांना संधी मिळाली.
1984 साली काँग्रेसच्या लाटेमध्ये काँग्रेसचे शरद दिघे तर 1989 साली सेनेचे विद्याधर गोखले या मतदारसंघाचे खासदार झाले.
1991 साली दिघे यांना परत संधी मिळाली. 1996 साली शिवसेनेचे नारायण आठवले विजयी झाले तर 1998 साली रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले या मतदारसंघातून विजयी झाले.
1999 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना या मतदारसंघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. याचवेळेस त्यांना केंद्रात मंत्री होण्याची आणि लोकसभेचे सभापती होण्याची संधी मिळाली. मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला.
2009 साली प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत गेल्या. परंतु 2014 आणि 2019 साली भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा सलग दोनवेळा पराभव केला.
आजवर झालेल्या निवडणुकांत रोझा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशा पाच महिलांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्या आहेत.
2019 साली काय झालं?
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाच्या पूनम महाजन यांना 4 लाख 86 हजार 672 मतं मिळाली तर प्रिया दत्त यांना 3 लाख 56 हजार 667 मतं मिळाली.
महाजन यांना 2014 च्या तुलनेत थोडी अधिक मतं मिळाली असली तरी त्यांच्या मतांची टक्केवारी या निवडणुकीत कमी झाल्याचं दिसून येतं. तर प्रिया दत्त यांच्या टक्केवारीत पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसतं.
2019च्या निवडणुकीआधी काही महिने प्रिया दत्त यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते मात्र राहुल गांधी यांनी भेट घेऊन चर्चा केल्यावर त्यांनी आपला निर्णय बदलला होता.
2024 साली कशी स्थिती?
2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली राजकीय स्थिती वेगानं बदलली आहे. लोकसभेच्या निवडणुकांनंतर 6 महिन्यांच्या काळात विधानसभेचा निकाल लागून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. परंतु अडीच वर्षातच हे सरकार कोसळले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र येऊन झालेला प्रयोग तितक्याच वेगानं ढासळला.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे मोठा गट घेऊन बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले. त्यामुळे 2019 च्या निवडणुका आणि यावर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फार फरक आहे.
कारण शिंदे आणि पवार यांचे दोन्ही गट आता भाजपाबरोबर सत्तेत असून या तिन गटांमध्ये जागावाटप होऊन पुढील बलाबल ठरेल. तर तिकडे भाजपाबरोबर लढणाऱ्या शिवसेनेतील एक भाग काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असेल.
या जागवाटपात ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार यावर पुढील भविष्य ठरेल. महायुतीमध्ये भाजपा आणि महाविकास आघाडीमधून काँग्रेसचा या जागेवर दावा असेलच पण तरीही त्यांना या जागा सोडाव्या लागल्या तर ती कोणत्या गटाच्या वाट्याला येणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.
काँग्रेसचे मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा पक्ष सोडून शिंदे गटात जाऊन राज्यसभेत गेले आहेत. बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी पक्ष सोडला नसला तरी पक्षावर थेट टीका सुरू केली आहे.
झिशान सिद्दिकी यांचा वांद्रे पूर्व हा मतदारसंघ काँग्रेससाठी आणि मतांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एकेकाळी शिवसेनेचे प्रकाश सावंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचे.
2014 सालीही सावंत यांचा विजय झाला होता. मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे तेव्हाचे नेते नारायण राणे यांना पराभूत केलं होतं.
संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे होतं. मात्र 2019 साली शिवसेनेने तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारलं आणि मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिलं. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली, या निवडणुकीत झिशान सिद्दिकी विजयी झाले आणि काँग्रेसला संधी मिळाली.
मात्र आता स्थिती बदलली आहे. निवडणुकीनंतर तृप्ती सावंत यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महाडेश्वर यांचं 2023 साली निधन झालं. नारायण राणे केंद्रात मंत्री झाले. तर सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
सिद्दिकी यांनी पक्षावरील नाराजी जाहीर पत्रकार परिषद घेऊन बोलून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेसला या लोकसभा क्षेत्रातील ज्या एकमेव विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला होता त्याचं पुढचं चित्र काय असेल हे सांगता येत नाही आणि लोकसभा निवडणुकीत याचा कसा प्रभाव पडतो हे सुद्धा पाहावं लागेल.
Published By- Priya Dixit