सांगलीच्या जागेवरील मविआतील तिढा काही सुटला नाही. कारण ही जागा ठाकरे गटासाठी जरी सुटलेली असली तरी सांगलीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी या जागेवर आपला दावा केला. परंतु, पक्षाकडून याबाबत कोणतेही उत्तर न आल्याने आज सोमवारी (ता. 15 एप्रिल) त्यांनी सांगली लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे मविआतील पहिली बंडखोरी समोर आली आहे.
सांगली लोकसभेतून मविआकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रहार पाटील यांनी अद्यापही उमेदवारी अर्ज भरलेला नसला तरी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर उद्या मंगळवारी ते काँग्रेसकडून आपला अर्ज भरणार आहेत, अशी माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. सांगली लोकसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल आहे. पण त्याआधीच विशाल पाटलांनी बंडखोरी करत मविआची डोकेदुखी वाढवली आहे. मात्र, याबाबत आता 22 एप्रिलआधी काँग्रेसच्या नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असल्याने त्यांचे सांगलीच्या राजकारणात वजन आहे. त्याशिवाय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देखील आहेत. ज्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा उत्तम प्रभाव आहे. त्याचमुळे की काय त्यांनी सांगली लोकसभेवर दावा सांगून मविआत मोठा तिढा निर्माण केला आहे. पण त्यांच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांमध्ये खळबळ उडाली असून ते चिंतेत सापडले आहेत.
Edited By - Ratnadeep Ranshoor