नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. जागा वाटप आणि उमेदवारांची घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
नाशिक लोकसभा जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आग्रही आहे. या लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत आहे. गोडसे हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमधील तिढा कायम आहे. या मतदारसंघातील उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे आज मंगळवारी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, नाशिकचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी गोडसे हे नाशिकच्या जागेबाबतचा १० पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
हेमंत गोडसे यांच्या १० पानी अहवालात काय लिहिलंय?
महायुतीकडून नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास शिंदेंच्या शिवसेनेत मोठं बंड होण्याची शक्यता आहे. तसेच पक्ष संघटन बांधणीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे यांच्या बंडाचा फटका नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बसू शकतो.
नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला असलेला विरोध पाहता निवडून येण्यातही अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच भुजबळांच्या उमेदवारी महायुतीची १ जागा कमी होईल. अशा अनेक मुद्द्यांचा सामावेश अहवालात असल्याची माहिती हाती आली आहे. आता गोडसे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर ते काय भूमिका घेतात,हे बघणं महत्वाचं ठरेल.
Edited By - Ratnadeep Ranshoor