मंदीच्या काळात बड्या बड्या कंपन्या 'झोपल्या' असताना निवडणुकीमुळे जाहिरात कंपन्यांची मात्र चांदी होत आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजच्या सर्वेक्षणानुसार यंदा लोकसभा निवडणुकीचा खर्च साडेचार हजार कोटी रूपयांवरून दहा हजार कोटी रूपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी गेल्या वर्षी झालेल्या खर्चापेक्षाही खर्च मोठा आहे.
या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष प्रचारासाठी चारशे कोटी रूपये खर्च करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या जाहिरातींवर कॉंग्रेस सर्वाधिक खर्च करत आहे. कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी क्रेयॉन्स एडव्हर्टायझिंग व जझेडब्लूटी यांनी सांभाळली आहे. त्यासाठी दीडशे कोटींचे बजेट आहे. शिवाय प्रेसेप्ट पिक्चर कंपनी जाहिरात प्रचारक असेल.
भाजपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या धर्तीवर पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांची प्रतिमा उभी करण्यासाठी ऑनलाईन मीडीया व मोबाईल सर्व्हिस ऑपरेटरची मदत घेतली आहे. याशिवाय ऑर्कुट, फेसबुक या साईट्सची मदत घेतली जात आहे. अडवानींची लॉंच केलेली नवीन साईट रोज किमान १४ हजार लोक पहातात, असा अंदाज आहे. भाजपने तीन कंपन्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.
क्रेयॉन्सला कॉंग्रेसच्या प्रचाराचे काम मिळाले आहे. पण गेल्या वेळी समाजवादी पक्ष व भाजपचा प्रचार करणार्या या कंपनीला कॉंग्रेसचे काम मिळविणे खूप अवघड गेले. पण आम्हाला राजकारण चांगले कळते हे त्यांना समजावून सांगितल्यानंतर काम मिळाल्याचे क्रेयॉन्सचे मुख्य संचालक कुणाल ललानी यांनी सांगितले.
भारतीयांचा सायबर वावर वाढल्याने राजकीय पक्षांनी सायबर प्रचारासाठीच्या निधीत दहा टक्के वाढ केली आहे. एरवी तीन ते चार वेबपेजेस बनविण्यासाठी तीन ते चार हजार रूपये देणारी मंडळी या काळात स्वतःची वेबसाईट बनविण्यासाठी पंधरा ते वीस हजार रूपये देण्यास तयार असतात, असे वेबसाईट डेव्हलपर कंचनने सांगितले.