Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेची 'पंचतारांकित' वचने

शिवसेनेची 'पंचतारांकित' वचने

वार्ता

शिवसेनेने आज जाहीर केलेल्या आपल्या वचननाम्यात दहशतवाद संपविण्याचे बांगलादेशीय घुसखोरांना हाकलण्याचे, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे व अबाधित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या वचननाम्यात वेगळे असे काहीही नाही.

शिवसेनेने सामान्यांसाठीचा हा वचननामा ओबेराय ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाहीर करून एक नवा पायंडा पा़डला. उद्धव यावेळी म्हणाले, की देशात विशेषतः महाराष्ट्रात परिवर्तनाचा माहौल आहे. लोकही शिवसेनेच्या बरोबर आहेत. त्यामुळे यावेळी आम्हाला सर्वाधिक जागा मिळतील यात काही शंका नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, खासदार भारतकुमार राऊत, सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित होते.

मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून दहशतवाद निपटून काढण्यासाठी पोटासारखा कायदा बनविण्यास व संसद हल्ला प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेल्या अफझल गुरूला फाशीवल लटकावण्यास शिवसेनेने या वचननाम्यात पाठिंबा दर्शवला आहे.

लोकांना बहुद्देशीय ओळखपत्र देण्याच्या मागणीवरही यात भर देण्यात आला असून निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता आल्यानंतर देशातील बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्याची व घुसखोरीला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगताना त्यांच्यावरील सर्व कर्ज माफ करण्याचे वचन यात दिले आहे. शेतकर्‍यांना पद्म पुरस्कारच नव्हे तर भारतरत्नही देण्याचे वचन दिले आहे.

राज्यातील वीज भारनियमनाचा उल्लेख करून लोकांना विना अडथळा वीज पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे वचन यात देण्यात आले आहे. शिवसेनेच्याच काळात एन्ऱॉन प्रकल्प समुद्रात बुडविण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना अखंडित वीज कशी देणार असा प्रश्न आहे.

या वचननाम्यावर राज ठाकरे यांच्या मराठी मुद्याचा प्रभाव यातही जाणवला आहे. स्थानिकांना नोकर्‍यांत आरक्षण देण्यासही वचनबद्ध असल्याचे यात म्हटले आहे. मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात विकासासाठी पैसा गोळा करणे, शेतकर्‍यांना समर्थन मुल्य जाहीर करणे, मुंबईतील बंद गिरण्यांतील कामगारांचे पुनर्वसन करणे, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वाद सोडविणे आदी मुद्देही या वचननाम्यात आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi