Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अयोध्येत राम मंदिर बांधणार- भाजप

अयोध्येत राम मंदिर बांधणार- भाजप

भाषा

भारतीय जनता पक्षाने रामनवमीचा मुहूर्त साधून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांना ओढून आणले आहे. हिंदुत्वाचा जुना राग आलापताना, अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आश्वासन पक्षाने आज प्रकाशित जाहिरनाम्यात दिले आहे. याशिवाय जम्मू व काश्मीरला विशेष स्थान देणारे कलम ३७० रद्द करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

वरूण गांधीच्या निमित्ताने निर्माण झालेल्या हिंदूत्वाच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी पक्षाने जाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घेतला असावा असे बोलले जात आहे. राम मंदिराव्यतिरिक्त भाजपने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दोन रूपये दराने ३५ किलो तांदुळ प्रती महिना देण्याचे आश्वासन दिले आहे. कॉंग्रेसच्या तीन रूपये दराने तांदूळ देण्याच्या आश्वासनावर कडी करण्यासाठी भाजपने किलोची किंमत रूपयाने कमी केली आहे. याशिवाय भाजप गहूही साडेतीन रूपये किलोने देणार आहे.

भाजपने स्वतःचा असा जाहीरनामा तब्बल ११ वर्षांनंतर जाहीर केला आहे. यापूर्वी १९९९ व २००४ मध्ये पक्षाने आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जाहीरनामा जाहीर केला होता. यात राम मंदिराबाबत कोणतेही आश्वासन भाजपने दिले नव्हते. हा पक्षाचा वैयक्तिक अजेंडा आहे एनडीएचा नाही, असे पक्षाने त्यावेळी स्पष्ट केले होते.

पक्षाने यावेळी 'पोटा' या दहशतवादविरोधी कायद्याचे पुनरूज्जीवन करण्याचेही आश्वासन दिले आहे. प्राप्तीकराच्या जाळ्यातून लष्कराची सुटका करण्याचे आणि 'वन रॅंक वन पेश्नन' धोरण अवलंबायचे आश्वासनही पक्षाने दिले आहे. तसेच लष्करासाठी स्वतंत्र वेतन आयोगाची शिफारसही जाहिरनाम्यात घेतली आहे.

याशिवाय आणखी एक महत्त्वाची व लोकप्रिय घोषणा पक्षाने केली आहे. तीन लाखापर्यंत प्राप्तीकर माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांसाठी ही मर्यादा साडेतीन लाख असेल. शेतकर्‍यांवरील सध्याचे सर्व कर्ज माफ करून चार टक्के दराने नवे कर्ज देणार असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे मंदिराला राम राम

Share this Story:

Follow Webdunia marathi