यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कॉंग्रेससाठी तर विशेषच. पाच वर्षे आघाडीचा संसार करून झाल्यानंतरही पक्षाने उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन प्रमुख राज्यांत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. हा निर्णय किती यशस्वी ठरला ते निवडणुकीनंतर कळणार आहे.
गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने ५४३ पैकी ४१७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी फक्त १४५ जिंकल्या होत्या. यावेळी पक्ष ४४० जागा लढवत आहे. त्यामुळे यावेळी त्यापेक्षा जास्त जागा मिळतील, अशी पक्षाला अपेक्षा आहे.
पक्षाचे नेते जयराम रमेश यांच्या मते, या वेळची निवडणूक चुरशीची आहे. पण तरीही कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील अशी आशाही आहे. कॉंग्रेस आघाडीतून तमिळनाडूतील पीएमके हा पक्ष गेल्याचा धक्का मोठा असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अटलबिहारी वाजपेयींची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवेल. कारण लालकृष्ण अडवानींच्या नावावर मते मिळणार नाहीत, असा दावा करून कॉंग्रेसला गेल्या पाच वर्षातील विकासकामाच्या जोरावर मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.