पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज कम्युनिस्टांच्या गडात धडक मारून त्यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली. डावे आणि तिसरी आघाडी धर्मनिरपेक्ष शक्तींना कमकुवत करून सांप्रदायिक भाजप आघाडीला सरकार स्थापनेसाठी मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
डावी आघाडी किंवा कथित तिसर्या आघाडीला केंद्रात कधीही सत्ता स्थापन करता येणार नाही. पण त्यांच्या सवत्यासुभ्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची मात्र विभागणी होईल. त्याचा फायदा भाजपला होईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बायपास सर्जरी झाल्यानंतर पंतप्रधानांनी घेतलेली ही पहिलीच प्रचार सभा होती.
ऐक्य आणि सौहार्दासाठी प्रसिद्ध असलेले केरळवासीय धर्मांध भाजपचे सरकार केंद्रात येऊ न देण्यासाठी डाव्यांना मदत करणार नाहीत, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. सत्तेच्या लोण्यासाठीच एकत्र आलेल्या आघाडीच्या कडबोळ्याला निवडायचे की पाच वर्षे स्थिर सरकार देणार्या कॉंग्रेस आघाडीला पुन्हा एकदा संधी द्यायची असे दोन पर्याय लोकांपुढे आहेत, असे ते म्हणाले. केरळमध्ये दीर्घकाळ राज्य करणार्या डाव्यांनी नेहमीच चुकीची भूमिका घेतली आहे, असे इतिहास सांगतो, असे स्पष्ट करून महात्मा गांधींनी चलेजाव चळवळ सुरू केली तेव्हाही डावे त्यात सहभागी झाले नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.