''
नाना, मी आणि विशाल ऑफिसमध्ये जात आहोत. फ्लॅटचं दार बाहेरून लावून घेतलं आहे व किल्ल्या माझ्याबरोबरच घेऊन जातेय. म्हातारपणामुळं तुमचं डोकं काही ठिकाणावर राहत नाही. तुम्ही दार उघड ठेवाल. हल्ली सोसायटीमध्ये चोर्या फार होत आहेत. लाइटचं बिल फार येतंय म्हणून कटाउट काढून घेतलाय.''''
भूक लागेल म्हणून दोन पोळ्या आणि थोडीशी भाजी डब्यात ठेवली आहे. तितकीच खाऊन घ्या. उगीच सारखं काही खाण्यासाठी अधाशीपणा करून डबे हुडकू नका. कारण जास्त खा-खा करून तुमची तब्येत बिघडली तर ऑफिस सोडून आम्हाला तुमचंच निस्तरावं लागेल.'' ''
राघू पोपटासाठी त्याच्या पिंजर्यामध्ये डाळ आणि पाणी ठेवलं आहे. मांजरीवर लक्ष ठेवा. ती त्याचा घास घ्यायला टपलीय. 'राघू तुमच्या हलगर्जीपणामुळे उडून गेला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. मी सांगितलेलं डोक्यात उतरलंय की नाही? बरं निघते मी. लक्ष ठेवा.'' विजयाने अशा असंख्य सूचना नानांना दिल्या व त्यांना फ्लॅटमध्ये 'कोंडून' विशालबरोबर ऑफिसमध्ये निघून गेली. गेल्या काही वर्षांपासून असंच चाललं होतं. नाना रिटायर झाल्यापासून एकुलता एक मुलगा, विशालबरोबर राहत होते. स्वत:जवळ जे होतं ते मुलाच्या नावावर करून दिलं होतं. आता मुलगा आणि सून जसं ठेवतील तसं राहणं भाग होतं. म्हातारपणामुळे भूक पण लागायची. काही नवीन खायची इच्छा व्हायची. पण दोन पोळ्या आणि थंड भाजी एवढ्यावरच त्यांना दिवस काढावा लागायचा. करमणुकीचे काहीच साधन नसायचे. लाइटचं बिल जास्त येतं म्हणून कटाउट काढल्यामुळे टिव्ही, टेप, रेडिओ सगळं बंद होतं. गरम होत असलं तर जुन्या रद्दी पेपरचा पंखा करून स्वतः वारं घ्यावं लागायचं. वेळ जावा म्हणून तोच पेपर वाचायचा. काही जुने पेपर तर सारखे सारखे वाचून तोंडपाठ झाले होते.
नाना आणि राघू पोपट फ्लॅटमध्ये दिवसभर एकटे असायचे. राघू पिंजर्यामध्ये तर नाना फ्लॅटमध्ये कोंडलेले. नानांना या जगण्याचा कंटाळाच आला होता, पण काही करू शकत नव्हते. कारण परस्वाधीनता. आजही तसंच झालं होतं. नानाचा काही केल्या वेळ जात नव्हता. त्यांनी दुपारी तीन-चार वाजेपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं आणि राघूनेही काहीच खाल्लं नव्हत. दोघे एकाच प्रकारच्या बंधनामध्ये होते. कोंडलेले. दोघांच्या समोर अन्न होत पण खायचं सुख नव्हतं.
नानांना सुनेचे शब्द आठवले - 'राघू तुमच्या हलगर्जीपणामुळे उडून गेला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे.'
नानांनी बराच वेळ विचार केला आणि मनामध्ये काही निश्चय केल्याप्रमाणे अचानक उठले पिंजर्याचं दार उघडलं व राघूला पकडून खिडकीच्या बाहेर मोकळ्या हवेत सोडून दिले. इतक्या वर्षांपासून बंदिस्त असलेला तो पक्षी एक क्षणामध्ये आकाशात भरारी मारून उडून गेला.
नानांना आपण केलेल्या कृत्यामुळे सून आणि मुलाच्या रागाला बळी पडण्याची भीती तर वाटली पण मनाच्या एका कोपर्यामध्ये दोन बद्ध जीवांपैकी एकाची सुटका झाल्याच समाधान पण होतं