क्रुझवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी सिनेमा अशी चर्चा होत असलेला 'वन वे तिकीट' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, मराठी सिनेमाला आंतराष्ट्रीय पातळीवर नेणारा हा सिनेमा १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याबाबतची अधिकृत घोषणा वांद्रे येथील लिंकरूममध्ये झालेल्या या सिनेमाच्या व्रॅपअप पार्टीत करण्यात आली. तत्पूर्वी, सिनेमाच्या क्लायमेक्स सीनचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. या शूटनंतर 'वन वे तिकीट' च्या संपूर्ण टीमने पार्टीचा आनंद लुटला. अलिशान वातावरणात पार पडलेल्या या पार्टीत 'वन वे तिकीट' सिनेमाचा फर्स्ट लूक देखील लाँच करण्यात आला. 'वन वे तिकीट' हा एक रोमांचक रोमान्स सिनेमा असल्याचे सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी सांगितले. 'हा सिनेमा एका वेगळ्या दुनियेची सफर घडवून आणेल' असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तर 'सस्पेन्स थ्रिलर असणाऱ्या या सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती आणि त्यांचा क्रुझवरचा प्रवास यावर आधारित आहे' असे सिनेमाची अभिनेत्री अमृता खानविलकर ने सांगितले. तसेच सचित पाटील आणि गष्मीर महाजनी यांनी सिनेमाच्या चित्रिकरणा दरम्यानची मजामस्ती शेअर केली.
इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून आतापर्यंत मराठीत न दिसलेले परदेशातले लोकेशन आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी यांसोबतच शशांक केतकर आणि नेहा महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मेकब्रँडच्या कोमल उनावणे या सिनेमाच्या निर्मात्या असून क्लिक फ्लिक फिल्म्सचे क्रिष्णानू मॉटी तर म्हाळसा एंटरटेनमेंटचे सुरेश पै ही दोघ सहनिर्माते आहेत. गौरव डगावकर आणि अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिल असून रुपंग आचार्य यांनी छाया चित्रिकरणाची धुरा सांभाळली आहे. परदेशवारीसोबतच मुंबई, पुणे आणि चिंचवड या ठिकाणी देखील या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.