कोणतेही व्यसन असो मग ते वाईटच. मद्य प्राशन करणे हा यापैकीच एक भाग. परंतु आता वैज्ञानिकांनीच थोडी थोडी पिया करो म्हणत, मद्य प्राशन केल्याने हृदयरोगापासून बचाव होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तरुणांमध्ये मागील काही दिवसांपासून हृदयरोगांचे प्रमाण वाढले आहे. याच कारणांमुळे बोस्टन येथील हॉवर्ड स्कूलने एल्बर्टो एस्चेरिया यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे सर्वेक्षण केले.
तरुणांनी दिवसभरात एक किंवा दोन पेग घेतल्याने त्यांना हृदय विकार होत नसल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. परंतु यापेक्षा अधिक प्रमाणात मद्य प्राशन केल्याने इतर रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रयोगासाठी 75 हजारांवर पुरुष तर एक लाख 92 हजार महिलांची पाहणी करण्यात आली. संशोधनातील व्यक्ती मद्य प्राशन करत असल्याने त्यांचा यात समावेश करण्यात आल्याचे एस्चेरियो यांनी स्पष्ट केले आहे.
दररोज 30 ग्राम किंवा दोन ते तीन पेग मद्य प्राशन केल्याने पुरुषांमधील हृदय विकाराचे प्रमाण 31 टक्क्यांनी कमी होत असल्याचे यात स्पष्ट झाले आहे.