नाना पाटेकर यांचा जबरदस्त अभिनय असलेला आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट तात्यासाहेब शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ ह्या अजरामर नाटकावर आधारित असून या चित्रपटात नाना पाटेकर आप्पासाहेब बेलवलकर ह्या नटसम्राटाच्या भूमिकेत आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी सध्या उत्सुकता ताणली गेली असतानाच, चित्रपटाच्या नव्या ट्रेलर लाँच वेळी नानांनीच आता ह्या चित्रपटाचा पूर्वभाग म्हणजेच प्रिक्वेल बनणार असल्याची घोषणा केली.
नाना पाटेकरांनी ट्रेलर लाँचवेळी महेश मांजरेकरांच्या मनातील ही गोष्ट जाहीर केली. आप्पासाहेब बेलवलकरांचा नटसम्राट होण्याचा काळ यात दाखवण्यात येईल. दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी याविषयी बोलताना सांगितले, नानांसोबत एक फिल्म केल्यावर आता अजून एक फिल्म करना तो बनता है, मनात नटसम्राटचा प्रिक्वेल बनवण्याचा विचार आला, तो मी नानाला बोलून दाखवला. पण कथा कशी असेल, ते अद्याप कागदावर उतरवले नाही. नटसम्राट चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मगच दुसर्या चित्रपटावर काम सुरू करू. नटसम्राटाच्या यशस्वी कारकिर्दीवर, तो नटसम्राट कसा झाला, ह्यावर कदाचित चित्रपटाचा विषय असू शकेल. आता सध्या डोक्यात ह्या कथेविषयीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. कथेत नाना असेल हे नक्की. बाकी आताच्या चित्रपटातील पात्रांपैकी कोण असेल आणि कोण नसेल ते काही आताच सांगता येणार नाही. पण येत्या वर्षात त्या दिशेने पावलं उचलायचा विचार सध्या मनात आहे.