सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या कसदार लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथेला गिरीश साळवी आणि राजेश देशपांडे यांनी पटकथेत बांधलं असून राजेश देशपांडे यांनीच चमकदार संवादांची फोडणी दिली आहे.सहजपणातून फुलणार्या अन् निखळ प्रासंगिक विनोदानं धमाल उडवणार्या पण त्याचवेळी सामाजिक भान जपणार्या 'धुडगूस' या चित्रपटाचं दिग्दर्शन 'कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक' या सुपरहिट मालिकेचे दिग्दर्शक राजेश देशपांडे करीत आहेत. अनेक मालिका, नाटकांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर देशपांडे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट.मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बडे कलाकार 'धुडगूस' मध्ये दिसणार आहेत. संजय नार्वेकर, निर्मिती सावंत, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी, सुहास पळशीकर, विनय आपटे, विजय चव्हाण, अविनाश नारकर, उदय सबनीस, किशोर चौगुले, रवींद्र बेर्डे, शरद पोंक्षे, हेमांगी कवी, माधवी जुवेकर, सुहास परांजपे, लीना भागवत, अरुण होर्णेकर, कुशल बद्रिके, शीतल शुक्ल, प्रशांत चोडप्पा, पुर्णिमा अहिरे आदी नामवंतांची मांदियाळी या चित्रपटात आहे.
'चेकमेट' या आपल्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाच्या भव्य यशानंतर आपल्या लाडक्या छायाचित्रणाकडे कॅमेरामन संजय जाधव पुन्हा वळले असून टेक्निकली कॅमेराची अनोखी करामत 'धुडगूस' मध्ये ते दाखवणार आहेत.
कला-दिग्दर्शक विश्वनाथ मेस्त्री यांच्या कला-दिग्दर्शनाखाली कोल्हापूर येथे किश्याबापूचा मळा, राजपूत वाडी, कोरेगाव आदी ठिकाणी 'धुडगूस'चे चित्रीकरण वेगाने सुरू असून एका सत्रात चित्रपटाचे सर्व चित्रीकरण पूर्व करून पुढील तांत्रिक काम पूर्ण केले जाणार आहे. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात भव्य स्वरूपात प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती 'मैत्र एंटरटेन्मेंट'तर्फे कार्यकारी निर्माते पवन वैद्य यांनी दिली.