Publish Date: Sun, 02 Nov 2014 (22:24 IST)
Updated Date: Sun, 02 Nov 2014 (22:26 IST)
अनेक नव अभिनेत्रींना आपण एखाद्या ग्लॅमरस हिरोसोबत काम करावं, असं नेहमीच वाटतं. तत काही नवल नाही. पण अशीच भावना एखाद्या प्रस्थापित, प्रसिध्द अभिनेत्रीनेही मनोमन जपली तर? असंच काहीसं घडलं मराठीतील सुप्रसिध्द अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या बाबतीत. प्रेमाची गोष्ट हा सिनेमा पाहिल्यापासून तिला अतुल कुलकर्णीसोबत रोमॅन्टिक सिनेमा करण्याची इच्छा होती. मात्र, अतुल ज्या प्रकारचे चित्रपट करतो, ते पाहता ही इच्छा पूर्ण होईल की नाही, याबाबत तिला शंका होती. मात्र, लवकरच प्रदर्शित होणार्या हॅप्पी जर्नी या चित्रपटाचनिमित्त अनपेक्षितपणे तिची ही इच्छा पूर्ण होणार आहे. 28 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्यात पल्लवी सुभाष आणि अतुल कुलकर्णी ही फ्रेश रोमॅन्टिक जोडी पाहाला मिळणार आहे. या सिनेमात अतुल आणि प्रिया बापट हे बहीण-भावाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. गंध, रेस्टारंट, अय्या असे हटके चित्रपट देणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या या चित्रपटाची निर्मिती मी शिवाजी राजे भोसले बोलतो, तुकाराम, आजचा दिवस माझा आदी यशस्वी चित्रपटांचे निर्माते संजय छाब्रिया यांच्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने केली आहे.
या संदर्भात पल्लवी म्हणाली, अतुल आणि मी कधी एकत्र काम केलं नसलं तरी आम्ही खूप आधीपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्याचा प्रत्येक सिनेमा मी बघते. त्याची खूप मोठी फॅन असल्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा होतीच. त्यातच मी त्याच्या प्रेमाची गोष्ट हा सिनेमा पाहिला. त्यातील त्याची रोमॅन्टिक भूमिका मला इतकी भावली की, त्याच्यासोबत आपल्यालाही असाच रोमॉन्स करायला मिळाला तर किती बहार येईल, असं मला तीव्रतेनं वाटलं.