Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भंडारदरा

जलसानिध्यात निसर्ग

भंडारदरा

मनोज पोलादे

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व ट्रेकर्सना साद घालणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे भंडारदरा. सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई येथेच आहे. प्रवरा नदी अडवून येथे भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे.

धरणांचे दुरपर्यत पसरलेले पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीयच. येथील विल्सन धरण प्रेक्षकांचे आकर्षण आहे. धरणाच्या पायथ्याशी छानशी बाग आहे. येथे एका मोठ्या खडकावरून धरणाचे पाणी सोडले जाते.

SJ
तेथून कोसळताना त्याचे तुषार अंगावर घेण्याचा आनंदही काही और आहे. कळसूबाई पर्वताचे विशाल रूप आपल्याला कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्राप्रमाणे बघायचे असल्यास भंडारदरयाला यायलासं हवे. विल्सन धरणाच्या पाण्यात कळसूबाईचे प्रतिबिंब पाहून चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात.

शिवकाळात शत्रूपासून स्वराज्याचे संरक्षण करून आगाऊ सूचना देण्यासाठी टेहळणी मनोरयाचे काम करायचे ते कळसूबाई शिखर. सह्याद्रीच्या पर्वरांगात निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे भटकायचे झाल्यास भंडारदरा आदर्श ठिकाण आहे.

याच परिसरात असलेला रतनगड ट्रेकर्ससाठी आव्हान आहे. जवळच असलेला रंधा फॉल तब्बल 45 मीटर उंचीवरून खाली कोसळतो. तो पाहणे हाही एका आनंददायी अनुभव ठरावा. येथील पर्वत रांगामधून शांतपणे प्रवरा नदी शांतपणे वाहते.

येथे अगस्ती ऋषींचा आश्रमही आहे. प्रभू रामचंद्रांना अगस्ती ऋषी येथेच भेटले असल्याचे संदर्भ आहेत. भंडारदर्‍यास भेट देण्यासाठी हिवाळा हा चांगला मोसम आहे. या परिसरातील पाऊस अनुभवणे हाही एक आनंददायी भाग आहे.

जाण्याचा मार्ग :

मुंबईपासून भंडारदर्‍याचे अंतर आहे साधारणत 185 किलोमीटर. रेल्वेने जायचे झाल्यास मध्य रेल्वेवरील इगतपुरीला उतरायचे. इगतपूरीहून भंडारदरा 40 किलोमीटरवर आहे. पुणेकरांना जायचे झाल्यास रस्त्याने अंतर आहे साधारणता 200 किलोमीटर.

Share this Story:

Follow Webdunia marathi