Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्कंडा मंदिर

- किर्ती मोहरिल

मार्कंडा मंदिर
MHNEWS
भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. पाण्याच्या ठिकाणी असणारी जीवन धारण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीने निर्विवादपणे मान्य केली आहे. म्हणूनच आपल्या पवित्र स्थानांना आपण 'तीर्थक्षेत्र' म्हणतो. नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशा उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्र विकसीत झालेली दिसतात. असेच एक तिर्थक्षेत्र आहे 'मार्कंडा'.

उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचे खजुराहो मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात आहे. संथपणे वाहणारी उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरचे अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे बघता क्षणीच मनाला भुरळ घालणारे आहे. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फुट लांब आणि पुर्व-पश्चिम १६८ फुट लांब काटकोनात वसलेली आहेत. सभोवती असलेल्या ९ फुट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी प्रकारामध्ये एकुण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृषंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तीदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भिमेश्वर, विरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.

अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य. मानवी जीवनाच्या विविध छटा आणि अनुभवांचे मुर्तीमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहर्‍यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. 'मैथुन शिल्पे' हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलावंतांनी जीवनाचा सर्व अंगांनी केलेला विचार बघून आपण थक्क होतो. मार्कंडा मंदिरांना 'विदर्भाची काशी' म्हणतात ते उगाच नाही.

या मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मुर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा ती 'आम्रपाली' चे द्योतक असावी. या मुर्तीवरचे अलंकार, वस्त्र, सगळेच देखणे एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते आणि आपण आपोआपच या अनामिक शिल्पकारांपुढे नतमस्तक होतो.

मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरु इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे काहीशी वर्दळीपासून दूर आहेत. १५० वर्षापूर्वी या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे खूप नुकसान झाले आहे. थोडी पडझड झाली आहे. पण या मंदिरांचे देखणेपण आजही टिकवून आहेत. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे. त्याचे तेवढ्याच समर्थपणे जतन झाल्यास येणार्‍या पिढ्यांना भारतीय लोकजीवनाचे एका दालनाची कायम सोबत होईल.

साभार : महान्यूज

Share this Story:

Follow Webdunia marathi