Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोणावळा

निसर्गाच्या कुशीत

लोणावळा

मनोज पोलादे

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यामुंबईपासून जवळ असल्याने वीकएंडला रोजच्या घाईगर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून पर्यटकांची पावले लोणावळयाकडे वळल्याशिवाय राहत नाहीत.

मुंबईपासून लोणावळा 110 तर पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत.

येथून दोन किलोमीटरवर कैवल्यधाम हा योगाश्रम आहे. येथे योगिक उपचारांसोबतच संशोधन व योग प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. लोणावळयानजीक मळवलीवरुन कार्ले व भाजे लेणी अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावर आहेत.

येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.

पावसाचे व अतिउन्हाचे काही दिवस सोडले तर इतर कालावधी ट्रेकिंगसाठी उत्तम. लोणावळयाजवळच्या कार्ला टेकडयांमधीलं डयूक्स नोज हा पॉईट तर ट्रेकर्सना आव्हान देणारा. येथील पावसाळी पर्यटनही तेवढच प्रसिद्ध.

मुसळधार पावसात चिंब भिजत येथील दर्‍याखोर्‍यात भटकंती करण्याची व भुशी धरणावर पावसाचे तुषार अंगावर झेलत चिंब भिजण्यातली मजा काही औरचं! आणि हो लोणावळ्यात गेलात तर तेथील चिक्की खाण्यास विसरू नका. चिक्कीसाठी हे गाव अतिशय प्रसिद्ध आहे. खास चिक्कीची अनेक दुकाने येथे आहेत.


जाण्याचा मार्ग ः

बसने जायचे झाल्यास पुण्याहून दर दोन तासांनी बस सेवा उपलब्ध आहे. लोणावळयाला रेल्वेनेही जाता येते. लोणावळा पुणे मुंबई रेल्वेमार्गावर आहे. येथे जलदगती ट्रेनसुद्धा थांबतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi