Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वनदुर्ग वासोटा

वनदुर्ग वासोटा
MHNEWS
साहसाची अनुभुती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.

सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वहाते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळा पर्यंत पसरलेले आहे.

सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पुर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणामधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील चिपळूण कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पुर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जावू शकतो. गडावर मुक्काम करायचा असल्यास सातारा वनविभागाकडून परवानगीचे पत्र घ्यावे लागते.

लॉच मधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यावर हे अंतर कमी जास्त होते. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पुर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.

या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मुर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. यात प्रामुख्याने गवे आणि अस्वले आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणि केव्हाही दर्शन देवू शकतो. त्यात गवा आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षीततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

अर्धा अधीक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होवून कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडामध्ये प्रवेश करतो.

या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पुर्वेकडील बाजूस पाहोचतो या बाजूने आपल्याला शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येवून उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे.

जावळीचा प्रदेश शिवरायांनी ताब्यात घेतल्यावर जावळी बरोबरच वासोटाही ताब्यात आला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. रेव्हिंग्टन व इतर इंग्रज कैदी वासोट्यावरच बंदिस्त करून ठेवले होते. येथेच शिवरायांना मोहरांचे हंडे सापडले होते. ताईतेलीनीने पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांच्या विरूद्ध वासोटा किल्ला लढवला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. वासोट्याचा किल्ला त्या परिसरातील घनदाट जंगल, निसर्गाची अनोखी रुपे मनात साठवितच आपण गड उतरायला सुरुवात करतो. वासोट्याच्या भेटीत आपण नागेश्वरही पाहू शकतो. अर्थात त्यासाठी तीन-चार तासांचा अवधी हाताशी असणे आवश्यक आहे. उजेडातच पायथा गाठून लॉचने परतीचा मार्ग स्विकारणे सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे ठरते.

Share this Story:

Follow Webdunia marathi