Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोणार विवर

लोणार विवर

वेबदुनिया

WD
लोणार हे उल्कापाताने नैसर्गिकरीत्या तयार झालेलं जगातील तिसर्‍या क्रमांकाचं विवर (Crater) आहे. विवर म्हणजे मोठ्या आकाराचे प्रचंड खोल असे निसर्ग निर्मित सरोवर. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी अठराशे तेवीस मध्ये या विवराचा शोध लावला. आईना-ए-अकबरी, पद्मा पुराण व स्कंध पुराणासारख्या प्राचीन ग्रथातही विवराचा संदर्भ सापडतो. बेसॉल्ट खडकामध्ये म्हणजे काळ्या दगडात आकार घेतलेलं लोणार विवर हे जगातील एकमेव विवर आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ते आहे.

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्वस नव्वद किलोमीटरवर लोणार आहे. गावाच्या सीमेवरच हे विवर आहे. त्याचा व्यास आहे अठराशे तीस मीटर आणि खोली एकशे पन्नास मीटर. सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी कोसळलेल्या एका प्रचंड अशनीमुळे म्हणजेच एका मोठ्या उल्कापातामुळे येथील काळ्या खडकात हे प्रचंड आकाराचे विवर निर्माण झाले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

या विवराचा वरचा भाग वर्तुळाकार असून त्याचा परिघ सहा किलोमीटर इतका आहे. विवरात मधोमध वर्तुळाकार भागात पांच ते सहा मीटर खोलीचे खारे पाणी असून तळ्याचा परिघ अंदाजे चार किलोमीटर आहे. विवराच्या कडा सत्तर ते ऐंशी अंशाच्या उतारात असून त्यावर वृक्षराजीचे आच्छादन आहे.

तलावा काठी बाराव्या आणि तेराव्या शतकातील मंदिरे आहेत. सरोवराच्या बाहेरील बाजूस स्वच्छ पाण्याची अखंड वाहणारा झरा असून त्याचा उगम गंगेपासून झाल्याचे मानण्यात येते. या धार मंदिर समूहात बारमाही गोड्या पाण्याची धार पडत असते. या‍शिवाय सीता वाहिनी व रामगया असे दोन झरे आहेत. लोणार सरोवराचे पाणी मात्र खारट आहे. तेही समुद्राच्या पाण्याच्या सातपट खारट! त्यात क्लोराईड आणि फ्लुरॉईडसचे प्रमाण जास्त आहे. परिसरातील क्षार वाहून तळ्यात जमा होतात.

हजारो वर्षे एकाच ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे या पाण्याला तीव्र खारटपणा आला असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे. असं म्हणतात की, निजामाच्या काळात या पाण्यापासून मीठ तयार करून ते विकले जात असे. तसेच हे पाणी साबण तथा काच कारखान्यातही वापरले जात असे. अशाप्रकारच्या जुन्या नोंदी अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. गंमत म्हणजे दगडी तलावातील हे पाणी मुरायला मार्ग नाही. उन्हाच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन कमी होईल तेवढाच पाण्याचा र्‍हास.

लागुनच वन्य जीव अभयारण्य आहे. ते 384 हेक्टर क्षेत्रात पररले अहे. या परिसरात सुमारे पंचाहत्तर जातींचे पक्षी असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. मोर, नीलकंठ, घुबड, बगळे, पारवे, ससाणा, करकोचा इत्यादी पक्षांचा येथे मूक्त वावर असतो. याशिवाय चिंकारा, लांडगा, तडस, कोल्हा, घोरपड, मुंगुस, माकडे, साप, खार, ससा इत्यादी समृद्ध प्राणीसंपदा आहे. माकडे तर सर्वत्र दिसतात. विभिन्न प्रकारची वृक्षवल्लीही आहे.

दंतकथेनुसार भगवान विष्णूने लोणार येथे लोणासुरावर विजय मिळविला होता. त्यामुळे लोणार नांव प्रचलित झाले. येथे दैत्य सूदनाचे प्राचीन व सुंदर मंदिर आहे. यादवकालीन हेमांडपंथी वास्तुशिल्पाचा तो उत्कृष्ट नमुना आहे.

लोणार सरोवरापासून काही अंतरावर अंबर तळे असून तेही उल्कापातानेच निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या तळ्याजवळ हनुमान मंदिर आहे. लोणार सामान्य पर्यटकाशिवाय जगभरातल्या वैज्ञानिकांना आकर्षित करते. देश परदेशातल्या संशोधन संस्था व विद्यापीठांनी येथे सखोल भूशास्त्रीय अभ्यास केला आहे. अर्थातच लोणार परिसराचे हे वैज्ञानिक, ऐतिहासिक, आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

राहण्याची व्यवस्था : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहे. यात डॉरमेटरी, अत्याधुनिक भोजन कक्ष, राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या उपलब्ध आहेत.

जाण्याचा मार्ग : लोणार विमान, रेल्वे व रस्त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. विमानाने जायचे झाल्यास जवळचे विमानतळ आहे औरंगाबाद. औरंगाबादचे येथून अंतर आहे सव्वाशे किलोमीटर. रेल्वेने जायचे झाल्यास मलकापूर गाठावे लागेल. मलकापूर मुंबई-भूसावळे रेल्वे मार्गावर आहे. औरंगाबाद, मेहकर, जालना, बुलढाणा येथून बससेवा उपलब्ध आहे. मुंबईपासून लोणार जवळपास सहाशे किलोमीटरवर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi