Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिरगावचा किल्ला

- प्रमोद मांडे

शिरगावचा किल्ला
MHNEWS
पालघर तालुका ठाणे जिल्ह्यात आहे. अरबी सागराचा किनारा पालघर तालुक्याला लाभलेला आहे. निसर्गरम्य अशा सागरी किनार्‍यावर काही दुर्ग आपल्या गतकालीन वैभवाच्या आठवणी जागवित आजही इतिहासाला उजाळा देत उभे आहेत. शिरगावचा किल्ला अशाच किल्ल्यांपेकी एक आहे. शिरगावचा किल्ला किनारी दुर्ग असून तो पालघरच्या पश्चिमेला आहे.

पालघरच्या पासून ७ ते ८ कि.मी. अंतरावर शिरगावचा किल्ला आहे. शिरगावचा किल्ला पहाण्यासाठी आपल्याला प्रथम पालघरला पोहोचणे आवश्यक आहे. पालघर हे मुंबई - अहमदाबाद मार्गाच्या पश्चिमेला आहे. महामार्गावरील मनोर येथून गाडीरस्ता पालघरला जातो. पालघर रेल्वे स्थानकही आहे. विरार येथून शटल अथवा मेलने पालघरला येता येते. पालघरपासून शिरगावला जाण्यासाठी एस.टी बसेसची सोय आहे.

शिरगावच्या एस.टी. थांब्यापासून पाच दहा मिनिटांमधे आपण किल्ल्याजवळ पोहचू शकतो. झाडी आणि हिरवीगार शेती तसेच नारळाच्या आणि ताडांच्या दाटी मधे वसलेले शिरगाव निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळे मनाला प्रसन्न करुन जाते.

गावाच्या मधे शिरगावचा किल्ला आहे. आपल्या वैशिष्ठपुर्ण बांधणीने प्रथमदर्शनीच आपल्याला आकर्षून घेतो. पोर्तृगिजांनी बांधलेल्या शिरगावचा किल्ला त्यावरील मनोर्‍यामुळे लक्षवेधक आहे. किल्ल्याच्या तटांची रुंदी १० फूट असून त्याची तटबंदी ३० ते ३५ फूट उंचीची आहे. या तटबंदीमधील बुरुज ही भक्कम बांधणीचे असून बलदंड आहेत. किल्ल्याचे प्रवेशव्दार उत्तर बाजूला आहे. पहीला दरवाजा पुर्वाभिमुख असून त्याच्या बाजुने व्हरांडा आहे. पहील्या प्रवेशव्दाराच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. पहील्या दरवाजावरील नक्षीकाम पाहून आपण आत प्रवेश करतो. दोन्ही दरवाजांच्या मधे पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. दुसर्‍या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्या मधील पडझड झालेल्या वास्तू दिसतात. किल्ल्याचा आकार लहान असल्याने एकाच दृष्टीक्षेपात किल्ला दिसतो.

तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे. कोठीच वास्तू शेजारुन या दगडी पायर्‍यांवर गेल्या आहेत. या पायर्‍यांवरुन तटबंदीवर पोहोचल्यावर प्रवेशव्दाराच्या वर बांधलेल्या घुमटाकृती मनोर्‍यावर आपल्याला जाता येते. तटबंदीवरुन किल्ल्याला फेरी मारता येते. पुर्वेकडील आयताकृती मनोर्‍यावरुन शिरगावचे दृष्य चांगले दिसते. अशा प्रकारच्या मनोर्‍यांची रचना इतरत्र क्वचितच आढळते.

शिरगावचा किल्ला समुद्राच्या काठापासून काही अंतरावर आहे. पण पोर्णिमेला पुर्ण भरती आल्यास समुद्राचे पाणी तटबंदीपर्यंत पोहोचते असे गावकरी सांगतात. तटबंदीच्या आतील क्षेत्रफळ लहान असल्यामुळे आतल्या भागातील बांधकामे आटोपशीर आणि कमी जागेत बसवविलेली आढळून येतात.

पश्चिमेकडील बुरुजावरुन सागरकिनारा आणि सागराची निळाई सुंदर दिसते. या बाजुच्या तटबंदीमधे एक बंद केलेला चोर दरवाजाही आहे. किल्ल्यामधे असलेल्या ताडवृक्षांना फांद्या आहेत या प्रत्येक फांदीला पुन्हा एक एक फांदी आहे. या वृक्षाच्या प्रत्येक फांदीला एक शाखा असल्यामुळे दिसायला अतिशय सुंदर दिसते पण किल्ल्यातील या वृक्षांना फळे येत नाहीत असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

पोतृगिजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांनी इतर किल्ल्यांच्या बरोबरच हल्ला चढवला होता पण तो त्यावेळी ताब्यात घेता आला नाही. पुढे चिमाजी आप्पानी शिरगावचा किल्ला ताब्यात घेतला.

Share this Story:

Follow Webdunia marathi