नाशिकहून मार्गस्थ झालवर भल पहाटेला गारठलेल महाबळेश्वरला आम्ही पोहोचलो. चहा-नाश्ता झाला. सकाळच उत्साहवर्धक वातावरणात आमची गाडी प्रतापगडकडे निघाली. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजेच जावळीच्या खोर्यात प्रतापगड आणि सर्वागसुंदर वनदुर्ग मधु-मकरंद गड याठिकाणी जायचं ठरलं होतं. सकाळी प्रतापगड पाहिला आणि दुपारी आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या शतलोट या गावात पोहोचलो. एक मार्गदर्शक बरोबर घेतला. सर्वानी हर हर महादेवचा जयघोष केला आणि मकरंद गड चढण्यास सुरुवात केली.
समोर पूर्वेला मकरंद तर पश्चिमेला मधूचा सुळक्या भाग आव्हान देत होता. एक पाण्याची विहीर पाहून झाडांच्या गर्दीत शिरलो. कोना खोर्याचं जंगल इथपर्यंत पसरलेलं आहे. त्यातच जावळीचा गहिरा होत जाणारा घनगर्दपणा दृष्टीला पडतो. पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्रकाशकिरणांची वसुंधरेला भेटण्याची उत्सुकता यामुळे जंगल चढण सोपी वाटू लागली. पावले झपझप पडू लागली. ठिकठिकाणी कारवीचं रान सोबतीला होतं. चढण चढताना अनेक फसव्या वाटा दृष्टीला पडत होत. मार्गदर्शक असल्यामुळे चुकण्याची भीती नव्हती.
दोन तासांच्या चढणीनंतर आम्हाला एक शिवमंदिर दिसले. तिथे दर्शन घेऊन आम्ही थोडा विसावा आणि अल्पोपहार घेतला. बर्याच जणांकडे थर्मास असल्यामुळे गरम चहा मिळत होता. आम्ही मंदिराच्या पूर्व दिशेने माथ्याकडे निघालो. मोकळा आसमंत मुरुमाची घसरडी वाट सुरू झाली. थोडय़ाच वेळात उद्ध्वस्त दरवाजा दिसू लागला. अगदी माथ्यावर पुन्हा एक शिवमंदिर दिसले.
मंदिराच्या उत्तर भागात एका अवघड कपारीत पाण्याची टाकी आहे. मकरंद गडाच्या माथ्यावरून वाव्याकडे मधुगडाचा सुळका दिसतो. या मंदिरातच आम्ही मुक्काम केला. आमच्याबरोबर असलेल्या महिलांनी स्वयंपाक केला. रात्री चविष्ट जेवण मिळाले.
दूरवर पायथ्याशी लुकलुकणारे दिवे आणि आकाशातील टिपूर चांदणे मोहून टाकत होते. भल्या पहाटे उगवतीचे रंग उधळण्यासमयी सह्याद्रीचे चौफेर विहंगम दृश्य नहाळण्यात नजरेचं पारणं फिटलं. पूर्वेला कोना खोरे आणि महाबळेश्वर परिसर तर गडाच्या पश्चिमेला रसाळ, सुमार, महिपत हे त्रिकुट एकाच डोंगरधारेवर तोलून उभे असल्यासारखे वाटत होते.
दक्षिणेला चकदेव, महिमंडण, वासोटा ही कोना खोर्यातील ठिकाणे कुतूहल निर्माण करत होती. सर्व बाजूंचा सह्याद्री गोतावळा आणि मधुर आठवणींचा मकरंद गड नजरेत साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. प्रवासाचा शीण वाटला नाही. स्मृती मात्र तरळत होत्या.