Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-एक)

पर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-एक)
, सोमवार, 20 मार्च 2017 (20:00 IST)
पर्यटनाचा आनंद घेताना पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजन चुकले तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.
 
पर्यटनाचा आनंद घेताना पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजन चुकले तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटनाला जाताना कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 
 
पर्यटनासाठी योग्य ठिकाण व वेळ निवडण्याचे मोठे आव्हान पर्यटकांपुढे असते. आपण ज्या भागात राहतो, तेथील पर्यटनस्थळ किंवा मित्रांनी सुचविल्यानुसार बहुतांश पर्यटक पर्यटनाला जातात. पर्यटनाला जाताना कोणत्या वस्तूसोबत न्याव्यात हे त्या ठिकाणावर अवलंबून असते. 
 
गोव्यासह समुद्र किनारा असलेल्या ठिकाणी किंवा दक्षिणेमध्ये हिरवा निसर्ग पाहण्याकरिता जाताना परस्परविरोधी वस्तू सोबत घेऊन जाव्या लागतात. पर्यटनासाठी जाताना अत्याधुनिक कॅमेरा, हलकी व कमी वजनाची पाठीवर घेऊन फिरता येईल अशी बॅग, स्पोर्ट शूज, टी-शर्ट, जीन्ससह मोकळेढाकळे कपडे घेऊन जाण्यापासून तर ऐनवेळी आरोग्याला बाधा झाली तर आवश्यक औषधींपासून सर्वच बाबींचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते. 
 
देशातीलच नाही तर जगभरात सर्वाधिक पर्यटक हे निसर्ग पर्यटन करणारे असतात. यासोबतच गोवा, मुंबईतील बीचसह समुद्रकिनारी पर्यटन करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या ठिकाणी पर्यटनाला जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. 
 
बहुतांश किल्ले डोंगरावरच बांधलेले आहेत. तसेच पर्यटकांना हे गिरिदुर्ग अधिक खुणावतात. त्यामुळे गिरिदुर्गावर जाताना शुद्ध पाणी सोबत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. किल्ल्यांवर विहिरी, तळे, नद्या असतात. मात्र, तेथील पाणी सेवन करणे चुकीचे आहे. यासोबतच स्पोर्टस् शूज, कपडे व पाठीवर घेता येईल अशी बॅग असणे आवश्यक आहे. यामुळे डोंगरावर चढणे सहज शक्य होते. 
 
निसर्ग पर्यटन करताना
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशाच्या भौगोलिक स्थितीमध्ये विविधता असल्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात निसर्गाचे वैविध्य निदर्शनास पडते. सुंदर व मनमोहक निसर्ग, दऱ्या-खोऱ्या, जमिनीवर कोसळणारे धबधबे डोळ्यांना आनंद देतात. निसर्ग पर्यटन उन्हाळा किंवा हिवाळ्यात केले जाते. निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात हे त्या ठिकाणावर व ऋतुवर अवलंबून असते. निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कॅमेरा, ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील नकाशा तसेच ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती असणे, ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो, त्याच्या आजूबाजूला आणखी सुंदर पर्यटनस्थळे असू शकतात. जी फारशी प्रसिद्ध नसतात. त्याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. 
 
पर्यटनस्थळाचे बंद वार व वेळ महत्त्वाची
अजिंठा-वेरुळ येथील लेणी पाहण्यासाठी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंतचाच वेळ दिला जातो. ही लेणी बघायला किमान तीन तास तरी हवेत. येथे सायंकाळी चार वाजता पोहोचल्यावर सर्व लेणी पाहणे शक्य होत नाही. नागपूर येथील अजब बंगला आठवड्यातून एक दिवस बंद असतो. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटनाला जाताना त्या दिवशी संबंधित ठिकाणी जाण्यास बंदी तर नाही ना किंवा आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकतो की नाही? याचे नियोजन करणे आवश्यक असते. 
 
ऋतू व ठिकाणानुसार साहित्याची निवड
आपण पर्यटनाला कोणत्या ऋतुमध्ये जात आहोत तसेच कोणत्या ठिकाणी व किती दिवसांसाठी जात आहोत, यानुसार कपडे व सोबत घेऊन जाणाऱ्या साहित्याची निवड करणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी जात आहोत तेथील तापमान व वातावरणाची माहिती आधीच घेऊन ठेवायला हवी. थंडी असेल तर ऊबदार कपडे सोबत घ्यायला हवेत. यासोबतच स्वेटरसह अन्य कपडे आवश्यक आहेत. तापमान जास्त असेल तर सैल कपडे आवश्यक असतात. कपड्यांची निवड चुकली की, त्या ठिकाणी गेल्यावर अनेकांची प्रकृती ढासळते व त्यांना परत यावे लागते. काश्मीर किंवा लडाखसारख्या अतिशीत प्रदेशात जाताना हातमोजे, पायमोजे सोबत घेऊन जाणे व ते आपल्यासोबत असलेल्या छोट्या बॅगमध्येच असणे आवश्यक असते. 
(क्रमश:)
 
- अंकूश बाहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बद्री आणि दुल्हनिया यांचे तिसर्‍या पार्टचे प्लानिंग