Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 February 2025
webdunia

दुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय

दुर्मिळ चित्रसंग्रह असलेले सांगलीचे वस्तुसंग्रहालय
, सोमवार, 12 जून 2017 (14:59 IST)
सांगली संस्थानचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी संग्रहित केलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन 1954 साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.1976 पासून हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. संग्रहालय आकारमानाने लहान असले तरी त्यातील कलाकृती, खास करून संग्रहालयातील चित्रसंपदा अतिशय समृद्ध व मौल्यवान आहे. 
 
दोन परदेशी चित्रकार जेम्स वेल्स आणि ए. एच. मुल्लर यांची तैल रंगातील चित्रे हे या संग्रहालयाचे वैशिष्ठ्य आहे. जेम्स वेल्स या चित्रकाराने इ.स. 1790 ते 1792 दरम्यान प्रेसिंडेंट चार्ल्स मॅलेट यांच्या शिफारशीने भारतातील अनेक संस्थानिकांची चित्रे प्रत्यक्ष त्यांच्या दरबारात हजर राहून चितारली होती. त्यातील सवाई माधवराव पेशवे व नाना फडणवीस या इतिहास प्रसिद्ध व्यक्तींची त्यांनी चितारलेली मूळ चित्रे या संग्रहालयात पहावयास मिळतात. तर वंशाने जर्मन असणाऱ्या ए.एच.मुल्लर या चित्रकाराने रामायणावर आधारित चितारलेली 15 अप्रतिम तैल रंगातील चित्रे या संग्रहात प्रदर्शित केलेली आहेत. 
 
ए. एच. मुल्लर हे चित्रकार चित्रकलेच्या सर्व विषयात उदा. पोर्टेट काँपोझिशन, लँन्डस्केप, पुस्तकात छापावयाची चित्रे यात निष्णात होते. तरी पण फिगर काँपोझिशन त्यांना स्वत:ला जास्त आवडत होते असे वाटते. व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव ते नितांत सुंदर चित्रीत करीत असत हे या संग्रहालयातील ‘रामाचे सीतेस वनवासातील निवेदन’ व ‘राजकन्या ब्राम्हणाच्या मुलास दान देत असतांना’ या चित्रावरून दिसून येते. या चित्रास त्या काळी बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्ण पदक देखील मिळाले होते.
 
मुल्लर या चित्रकाराच्या समकालीन म्हणता येतील असे भारतीय चित्रकार रावबहाद्दूर धुरंधर यांची देखील पंचवीस चित्रे या संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहेत. त्यामध्ये, तैलरंग, जलरंग व क्रेझॉन पेन्सिल, पावडर शेडिंग अशा विविध चित्र प्रकारातील चित्रे येथे आपणांस पहावयास मिळतात. मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये धुरंधरांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि स्वत:च्या कर्तृत्त्वावर ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या डायरेक्टर पदापर्यंत पोहोचले. डॉ.अवनींद्रनाथ टागोर यांचे सहाध्यायी जी. पी. गांगुली यांचे एक अप्रतिम चित्र तैलरंगातील या संग्रहालयात आहे, ते म्हणजे "धुक्यातील आगगाडी". इटली येथील पिसाच्या झुकत्या मनोऱ्याची मार्बल मधील प्रतिकृती तसेच फत्तेपूर सिक्री येथील मुस्लीम संत सलीम चिस्ती यांच्या कबरीची मार्बल मधील प्रतिकृती आहे. या प्रतिकृती असून देखील संबंधित वस्तूंच्या वैशिष्ट्यांसह परिपूर्णतेने साकारण्यात आल्या आहेत. 
 
भारतीय प्राचीन संस्कृती प्रमाणेच युरोपीय कलेवर सर्वाधिक प्रभाव असलेली प्राचीन संस्कृती म्हणजे ग्रीक संस्कृती होय. केवळ कलेच्या बाबतीतच नव्हे तर युरोपातील आचार, विचार, तत्त्वज्ञान व जीवन यावरील ग्रीक संस्कृतीची छाप आजतागायत कायम आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. ग्रीकांनी मूर्ती कलेत इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा अत्यंत परिपूर्ण व उल्लेखनीय प्रगती केलेली आपणास पहावयास मिळते. त्यांच्या जीवन विषयक कल्पनेला अनुसरून ग्रीक मूर्ती शिल्प मानव केंद्रित आहे. या महान प्राचीन संस्कृतीमध्ये सॉक्रेटिस सारखे तत्वज्ञ व विचारवंत होऊन गेले. पेरिक्सीस व अलेक्‍झांडर या सारखे महान शासक होऊन गेले. त्यांचे पुतळे, ग्रीक शिल्पकलेचे नमुने या संग्रहालयात पाहू शकतो.
 
या संग्रहालयातील आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे विजयनगरच्या कृष्ण देवरायाचा ताम्रपट ! हा ताम्रपट संस्थान काळातील शिरहट्टी तालुक्यातील तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेल्या बिदरहल्ली या गावी एका शेतकऱ्यास शेत नांगरताना सापडला. तो तेथून आणून या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. या ताम्रपटाचा काळ शाली वाहन शके 1434 अंगिसर संवत्सर अश्विनशु 15 वार सोमवार आहे. त्या दिवशी चंद्रग्रहण असून त्या निमित्त केलेल्या दानाचा मजकूर त्यामध्ये समाविष्ट आहे. त्याची इंग्रजी तारीख 25 सप्टेंबर 1513 अशी आहे. या ताम्रपटाचे वाचन प्रसिद्ध इतिहास तज्ञ म.गो. दीक्षित यांनी केले आहे.
 
या संग्रहालयात प्रवेश करताच, आयर्विन पूलाचे लाकडी मॉडेल आणि राणी व्हिक्टोरिया राणीचा मोठा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोठा पुतळा आहे. जिन्यावरून वर जाताच राजेसाहेबांनी मारलेला 10 फूट लांबीचा ढाण्यावाघ आहे. तसेच पदरेशातून आणलेल्या नाण्यांच्या प्लास्टर मधील प्रतिकृती इथे ठेवण्यात आल्या आहेत. काचेचे चमचे, कलात्मक ड्रेसिंग टेबल, चित्याचे कातडे याबरोबर पुरूषोत्तम मावजी यांच्या संग्रहातील चिता, तळसंगी तलावातील छोटी व मोठी मारलेली मगर इथे आहे. तर आबालाल रहमान यांच्या शिवाजी अश्वारोहन हे तैल रंगातील चित्र, श्री भवानी मातेचा साक्षात्कार ही दुर्मिळ चित्रे असून चित्रकार लोटलीकर यांचे गंगा आपले अपत्य गंगानदीच्या पात्रात अर्पण करतांना शंतनुराजा यांचे तैल रंगातले चित्र संग्रहीत केले आहे ! तर मंडळी हे संग्रहालय एकदा तरी आवर्जुन पहायलाच हवे !
 
- विजय बक्षी
निवृत्त ग्रंथपाल, सांगली

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय-भूमीच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा'चे ट्रेलर रिलीज