मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी भुलाभाई देसाई मार्गावरील हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.
महालक्ष्मी म्हणजे अर्थातच धनाची देवता. तिची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर आकर्षक नक्षी आहे. मंदिराच्या परिसरात देव-देवतांच्या आकर्षक मुरत्या आहेत.
मंदिराचा इतिहास अत्यंत रोचक आहे. मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा चंग बांधला होता. मुंबई बेटाचं दक्षिण टोक, म्हणजे सध्या आपल्या महालक्ष्मीचे देऊळ आहे ते आणि समोरचे वरळी गाव तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिशानी द ग्रेट ब्रीच असे नाव दिले होते. ही यातायात बंद करण्याचे ब्रिटीश गव्हर्नरने ठरवले आणि मुंबई बेटातून वरळी बेटापर्यंत गाडी रस्ता बांधण्याचे काम चालू केले. याचे कंत्राट रामजी शिवजींनी सोपवण्यात आले होते. बांध घालण्याचे काम सुरु झाले परंतू समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांध कोसळून जात असे आणि पुन्हा सुरुवात करावी लागत होती. असे बरेच काळ सुरुच होतं.
समुद्राच्या तुफानी लाटांनी ही योजनाच बासनात गुंडाळली जाते की काय असे वाटत असताना देवीने रामजी शिवाजींच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि सांगितले की मला आणि बहिणींना महासागराच्या तळातून बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेवींच्या मुरत्या सापडल्या. मुर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी जागा मिळाली नंतर ब्रीच कॅंडी मार्ग विनासंकट साकारला.
नंतर रामजी शिवजीने महालक्ष्मीचे देऊळ बांधून त्यात महालक्ष्मी आणि महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास बांधले गेले आहे.
मंदिराच्या गर्भगृहात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मुरत्या आहेत. तिन्ही देवतांना सोने व मोत्याच्या आभूषणांनी सुशोभित केले आहे. महालक्ष्मीची प्रतिमा अग्रस्थानी असलेल्या कमळ फुलांना दर्शविलेल्या मध्यभागी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होते, असा भाविकांचा विश्वास आहे.
कसे पोहचाल?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक भागातून येथे येण्यास रेल्वे, रस्ता व हवाई मार्गाने सेवा उपलब्ध आहे.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ हे येथून 20 किमी अंतरावर आहे.
मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकापासून ते केवळ 1 किमी आहे.