Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'चव्हाण' ते 'चव्हाण' एक प्रवास...

- सुश्रुत जळूकर

'चव्हाण' ते 'चव्हाण' एक प्रवास...
MH Govt
MH GOVT
१ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० पासून १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत धुरा सांभाळली. यशवंतराव चव्हाण यांचे 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' असेही वर्णन केले जाते. नावातच "यश" आणि "यशवंत" असल्यामुळे त्यांना प्रारब्ध भाग्य आणि नशीब दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य केले. ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असेही त्यांना म्हणता येईल. गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना समाजातील तळागाळाच्या घटकांच्या समस्या ज्ञात होत्या, त्या दृष्टीने देखील त्यांनी योजना आखल्या.
राज्यात सहकार चळवळीपासून अनेक साखर कारखान्यांच्या स्थापनेसह कृषि, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे.
यशवंतरावांनी मुख्यमंत्री पदानंतर उपपतंप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री अशी महत्वाची पदे देखील सांभाळली. यशवंतराव यांची दुसरी ओळख म्हणजे त्यांचा साहित्यातही नावलौकिक असून ऋणानुबंध आणि कृष्णाकाठ या लिखित पुस्तकांमध्ये त्यांच्यातला चांगला लेखक दिसतो. याचबरोबर त्यांची पत्रं, त्यांना आलेली महनीयांची पत्रं देखील अजूनही जतन केलेली असून या पत्रांमुळे त्यांचा जनसंपर्क दिसून येतो. कराड येथे त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्या विविध वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. यशवंतरावांना चीन युद्धाच्या वेळी संरक्षणमंत्री पदावर नियुक्त करण्यात येऊन यावेळी त्यांनी त्यांचे कर्तृत्वाचे आणि निर्णयक्षमतेचा आदर्श जगासमोर उभा केला. हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावून गेल्याची अखिल महाराष्ट्राची त्यावेळी प्रतिक्रिया होती.

चव्हाणांचीच परंपरा राज्याचे तिसरे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पुढे चालविली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, अ. र. अंतुले, बाबासाहेब भोसले, पुन्हा वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण, पुन्हा शरद पवार, सुधाकरराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. २० वे मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत.

विलासराव देशमुख आणि वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद दीर्घकाळ उपभोगले. शरद पवार राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते महाराष्ट्राचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री ठरले. त्यावेळी ते अवघ्या ३७ वर्षांचे होते. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनी दोनदा मुख्यमंत्रिपद मिळविले. त्यातही शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पितापुत्रांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा नवा विक्रम केला. मनोहर जोशींच्या रूपाने पहिल्यांदा बिगर कॉंग्रेसी व्यक्ती मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसली.

शिवाजीराव निलंगेकर आणि अ. र. अंतुले या मुख्यमंत्र्यांना अनैतिक वर्तनासाठी राजीनामा द्यावा लागल्याचा कलंकही महाराष्ट्रावर लागला. अंतुलेंनी प्रतिभा प्रतिष्ठानद्वारे सिमेंटचा गैरव्यवहार केला, तर निलंगेकरांनी मुलीचे गुण वाढविण्यासाठी दबाव टाकल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

अशोक चव्हाण
webdunia
MH News
MHNEWS
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा आहेच. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांची या पदावर वर्णी लागली. राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून ८ डिसेंबर २००८ ला विराजमान झाले. यानंतर झालेल्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस विजयी होऊन मुख्यमंत्री पदाची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडली. मितभाषी आणि कर्तव्यदक्ष प्रशासक अशी चव्हाण यांची ख्याती आहे. सामान्य प्रशासन, नगरविकास, सांस्कृतिक कार्य, माहिती व जनसंपर्क, गृहनिर्माण, कमाल नागरी जमीन धारणा, झोपडपट्टी सुधारणा, घरदुरुस्ती व पुर्नंबांधणी इ. जबाबदार्‍या देखील श्री. चव्हाण पार पाडत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi