राज्यात सीएनएन-आयबीएन आणि आयबीएन लोकमत यांनी केलेल्या निवडणूकनंतरच्या मतदान चाचणीतून मतदारांनी आघाडीलाच आपली पसंती दिल्याचे म्हटले आहे. 135-145 जागा जिंकून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येणार असल्याचे एक्झीट पोलमध्ये मांडण्यात आले आहे. तर स्टार माझा नेल्सन एक्झीट पोलमध्येही आघाडीला सर्वाधिक 135 जागा दाखविण्यात आल्या आहेत. मनसेने 18 जागांवर मुसंडी मारणार असल्याचे स्टारने म्हटले आहे.
आयबीएनच्या एक्झीट पोलमध्ये कॉंग्रेसला 75-85 जागा दाखविण्यात आल्या असून राष्ट्रवादीला 55-65 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आघाडी 135-145 जागा घेवून सत्तेची हॅटट्रिक करणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप युतीला सत्ता मिळविण्यात पुन्हा अपयश येणार असून सेनाला 55-65 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मित्रपक्ष भाजपची घौडदौड 45-55 जागांवर थांबणार असून युतीला 105-115 जागा मिळून पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. राज ठाकरेच्या बहुचर्चित मनसेचा विधानसभेत प्रवेश निश्चित असून त्यांना 8-12 ठिकाणी यश दाखविले आहे. अपक्ष आणि इतर 25-35 जागांवर जिंकून येणार आहे.
स्टारच्या एक्झीटपोलमध्ये मनसेची मुसंडी
स्टार माझा नेल्सन एक्झीट पोलमध्ये मनसेने चांगल मुसंडी मारली आहे. नऊ टक्के मते घेवून मनसे 18 जागांवर यश मिळविणार आहे. शिवसेनेला राज्यात 63 जागा मिळतील तर भाजपाच्या वाट्याला 56 जागा येणार आहेत. आघाडीमध्ये काँग्रेसला 73 तर राष्ट्रवादीला 52 जागा मिळणार आहेत. रिडालोसला 5 जागा, अपक्ष उमेदवारांना 17 तर इतरांना 4 जागा मिळतील, असे भाकीत एक्झीट पोलमध्ये वर्तविले आहे.