काँग्रेसची आश्वासने म्हणजे 'रात गई बात गई'- शत्रुघ्न सिन्हा
कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सध्या महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागत फिरत आहे. अशावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आघाडीचे नेते नदी नसेल तेथेही पूल बांधण्याचे आश्वासन देत आहेत. कारण काँग्रेसची निवडणूक काळातील आश्वासने म्हणजे 'रात गई बात गई' अशाच प्रकारची असतात आणि हे काँग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना पक्के ठाऊक असते, अशी खरमरीत टीका सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते आणि भाजपा नेते खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी आज केली. ते अहमदनगर जिल्हयात प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्रात पाणी, वीज, रस्ते बांधणी, महागाई आदी आघाडयांवर अपयशी ठरलेल्या काँग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला मते मागण्याचा अधिकार नसल्याचे देखील सिन्हा यावेळी म्हणाले. तसेच काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सामान्यजनतेला झालेल्या त्रासाचे उत्तर जनतेने मतदानाद्वारेच द्यावे असेही आवाहन त्यांनी मतदारांना केले. काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने १ मेगावॉट इतक्या विजेचे सुध्दा जादा उत्पादन केले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठे उद्योग येत नाहीत. परिणामतः येथील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होत नाहीत, अशीही टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी केली.