Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसात वाहून गेला प्रचार!

पावसात वाहून गेला प्रचार!

वेबदुनिया

परतीच्या मोसमी पावसाने विधानसभा निवडणूक अक्षरशः धुऊन काढली असून उमेदवारांना एक तर भरपावसात प्रचार करावा लागत आहे किंवा शांतपणे घरी तरी बसावे लागत आहेत. स्टार प्रचारकांना पावसातच प्रचारसभा घ्याव्या लागत आहेत, पण पावसामुळे सभांचे नियोजन कोलमडले असून अनेक ठिकाणच्या सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. बड्या नेत्यांच्या सभाच रद्द झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी प्रचार 'ठंडा ठंडा कुल कुल' असाच आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित केले आहे. संततधार असल्याने वाडी-वस्त्यावर जाणेच मुळात उमेदवारांना अडचणीचे ठरले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका राजापूर, लांजा या दोन तालुक्यांना बसला असून उमेदवारांना प्रचार सोडून पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी जावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, दापोली, खेडमध्ये पावसाचा जोर कमी आहे.

कोल्हापूरमध्ये वेळापत्रक विस्कटले
कोल्हापूर- विधानसभा मतदानासाठी आठ दिवसाचा कालावधी उरला असताना पावसाचाही जोर असल्याने सर्वच उमेदवार्‍यांच्या प्रचारास मर्यादा आल्या असून त्यांचे सभा आणि पदयात्रांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पावसामुळे जाहीर प्रचारास मर्यादा आली आहे. मात्र, मोबाईल एसएमएसमधून तसेच टेलीकॉन्फरन्स, लहान हॉलमध्ये छोटे मेळावे यावर उमेदवारांनी जोर दिल्याचे दिसून येत आहे.

बुलडाणा : विकासात नेत्यांचा तर प्रचारात पावसाचा अडसर
बुलडाणा- बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय उद्योगमंत्री विलासराव देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, राजु शेट्टी, रिडालोसचे रामदास आठवले आदी नेत्यांच्या प्रचारसभा आटोपल्या. दुसर्‍या टप्प्यात सोनिया गांधी, नितीन गडकरी आदी नेत्यांच्या प्रस्तावित प्रचारसभांवर पावसामुळे पाणी पडले आहे.

पीक घरात आणण्यासाठी बळीराजा सज्ज असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाची तारांबळ उडाली आहे. त्यासोबतच प्रचारसभांची मैदाने गाजविणार्‍या नेत्यांच्या हेलीकॉप्टरचे येणे-जाणेही ठप्प झाले आहे. पाऊस म्हटला की नेते घराबाहेर पडत नाहीत. परंतु निवडणूकांच्या प्रचारसभांसाठी आणि पदयात्रांसाठी मात्र पावसात ओलेचिंब भिजून मतदार राजाला प्रभावित करण्यासाठी पाऊस कोसळत असताना आवर्जून बाहेर पडत आहेत

Share this Story:

Follow Webdunia marathi