शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भाऊबंदकी, भाजपमध्ये जिनाप्रकरणावरून चाललेला वाद, गडकरी मुंडे गटबाजी, पाडापडी याचीच चंगळ असून त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.
काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथील महेश चौकात आयोजित जाहिर सभेत विरोधी पक्षाचा समाचार घेताना देशमुख म्हणाले की, शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू असलेल्या संघर्षात मराठी माणसाचा श्वास गुदमरतोय. तर भाजपाचे माजीमंत्री जसवंत सिंगांनी 'जिना'वरील पुस्तकाने भाजपातील नेत्यांचे जिणे मुश्कील झाले आहे. राज्यात गडकरी विरूद्ध मुंढे यांच्या गटबाजी, पाडापाडीच्या राजकारणाने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विरोधी पक्ष सक्षम नसल्याने आगामी काळात आघाडीचेच सरकार राज्यात पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस सरकारने देशातील शेतकर्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. यानंतर सरसकट कर्जमाफीच्या माध्यमाने ६० हजार कोटी रुपये कर्ज माफ केले. आगामी काळात महिला बचत गटाची चळवळ पुढे रेटण्यासाठी आदिवासी महिला बचतगटास आणि मागासवर्गीय बचतगटास बिनव्याजी कर्ज दिले जाणार असून, काँग्रेसने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकर्यांना ३ टक्के व्याज दराने देण्याची घोषणा आपल्या जाहिरनाम्यात केली आहे.