Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसेला कॉंग्रेस आघाडीचा पाठिंबा नाही- मुख्यमंत्री

मनसेला कॉंग्रेस आघाडीचा पाठिंबा नाही- मुख्यमंत्री
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कॉंग्रेस आघाडीचा आतून अजिबात पाठिंबा नाही. मनसे आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यातील प्रत्येक नागरिकाचे दरडोई उत्पन्न एक लाख रूपयांपर्यंत नेण्याची काँग्रेस आघाडीची आकांक्षा आहे. त्यासाठी महाराष्ट्रच्या विकासाची नवी ओळख करून देत 'ग्लोबल महाराष्ट्र' निर्माण करण्याचे काँग्रेस आघाडी सरकारचे स्वप्न आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच अमरावतीत राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत यांच्याविरोधात बंडखोरी करणार्‍या सुनील देशमुख यांच्याविरूद्ध येत्या दोन दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणार्‍यांची समजूत काढण्याचे अखरेच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही त्यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येईल असेही चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोणतेही समर्थन नाही असे सांगत मनसे आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसमध्ये नेते खूप आहेत, मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःसह अनेक इच्छुक आहेत. तथापि, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय फक्त पक्षश्रेष्ठीच घेतील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदाराविरोधात बंडखोरी केली आहे. राज्यमंत्री ऍड. प्रितमकुमार शेगावकर डाव्या आघाडीतून सरकारवर टीका करत आहेत. तर मंत्री असलेल्या जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनीही सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना छेडले असता, याबाबतीत निश्चितच विचार करावा लागेल असे ते म्हणाले.

आघाडीच्या उमेदवारांची घोषणा होण्यास विलंब झाल्यामुळे बंडखोरी वाढली असे आपल्याला अजिबात वाटत नाही असे स्पष्ट करत, असे असते तर शिवसेना-भाजपामध्ये बंडखोरी का वाढली असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi