राष्ट्रपती भवनाशी असलेल्या संबंधांचा दुरुपयोग करून उमेदवारी मिळविणारे रावसाहेब शेखावत यांची जमानत जप्त करूनच मी आता शांत बसणार आहे, असा निर्धार अमरावती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि उच्च शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
'आता शेंडी तुटो वा पारंबी' ही निवडणूक लढणार आणि जिंकूनही दाखविणार. आता माझ्यावर पक्षश्रेष्ठींचा थेट दबाव आला तरी माघार घेणार नाही. कारण, हा प्रश्न आता माझ्या प्रतिष्ठेचा राहिलेला नसून, माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे. ज्या राजकीय पक्षांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांच्याही प्रतिष्ठेचा हा मुद्दा आहे, असे सुनील देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.