Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनाप्रमुखांचा विश्वास सार्थ ठरविणार- बांदेकर

शिवसेनाप्रमुखांचा विश्वास सार्थ ठरविणार- बांदेकर

वेबदुनिया

माझ्यासमोर प्रतिस्पर्ध्याचे नाही तर शिवसेनाप्रमुख आणि माय-बाप जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान आहे, असे उदगार माहीम विधानसभ मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार तथा `भावजी फेम' आदेश बांदेकर यांनी खास मुलाखतीत काढले.

WD
माहीम मतदारसंघातील उमेदवारीवरून झालेल्या राजकीय नाट्यानंतर बांदेकर यांच्यावर या मतदारसंघात भगवा फडकत ठेवण्याचे आव्हान आहे. यासंदर्भात बांदेकर म्हणाले की, आतापर्यंत विविध आव्हानांचाच सामना करत येथवर पोहचलो असल्याने आव्हानांकडे आपण एक संधी म्हणून पाहतो. कलाकार ते राजकारण असा प्रवास जरी करत असलो तरी आपल्यातला माणूस सदैव जिवंत आहे. म्हणूनच आपण घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचेही बांदेकर यांनी सांगितले.

माहीम मतदारसंघातील समस्यांसंदर्भात बांदेकर यांनी सांगितले की, नकारात्मक वृत्ती संपविण्यावर आपला नेहमीच भर राहिलेला आहे. त्यामुळेच दादरचा सांस्कृतिक चेहरा-मोहरा कायम ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी राहील. तसेच चाळ संस्कृती कायम रहावी आणि या मतदारसंघाचा मराठमोळा चेहरा कायम रहावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवापिढीशी सुसंवाद साधण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगत युवापिढीला नेहमीच आपल्यात त्यांचा मोठ्या भाऊ दिसेल असा विश्वास बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी अत्यंत संवेदनशील विषय असून प्रसंगी आक्रमक होऊन हा प्रश्न तडीस नेऊ असेही ते म्हणाले. नाट्यरंगमंचाचा कणा असलेले ङङ्गबॅकस्टेज आर्टिस्ट' यांच्याविषयी जिव्हाळा व्यक्त करत, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या मराठीबाण्याविषयी छेडले असता, ते म्हणाले की, महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी संस्कृतीशी समरस झाले पाहिजे अशी आपली आग्रही भूमिका आहे. शिवसेनेचा उमेदवार, आमदार, कलाकार म्हणवून घेण्यापेक्षा एक सामान्य शिवसैनिक व आम आदमी हीच प्रतिमा आपल्याला अधिक जिव्हाळ्याची वाटते आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचे विवेकी, गंभीर परंतू वेळप्रसंगी आक्रमक नेतृत्व आपल्याला भावते असे त्यांनी शेवटी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi