Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'राष्ट्रवादी'चे आमदार कर्डीले भाजपमध्ये

'राष्ट्रवादी'चे आमदार कर्डीले भाजपमध्ये
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सेना - भाजपाचेच सरकार येईल असा आत्मविश्वास व्यक्त करीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर येथील विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, उपाध्यक्ष किरीट सोमय्या आदी नेते उपस्थित होते.

सोमवारी भाजपातर्फे 'गुन्हेगारीने आवळला पाश, सुव्यवस्थेचा सत्यनाश' या नीतीन गडकरी यांनी तयार केलेल्या आरोप पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वाय. सी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन कार्यक्रमानंतर आ. कर्डीलें यांनी उपस्थित पत्रकारांच्या साक्षीने भाजपाप्रवेश केला. १९९४ साली अपक्ष म्हणून निवडून आलेल्या कर्डीले यांनी युतीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. कर्डीले ज्यांच्या बरोबर असतात त्यांचेच सरकार राज्यात येते आणि यंदा कर्डीले युतीबरोबर आहेत त्यामुळे विजय निश्चित आहे असे उद्गार भाजपा नेते मुंडे यांनी काढले. येत्या विधानसभा निवडणूकीत राहूरी या कर्डीले यांच्याच मतदारसंघात त्यांना भाजपातर्फे उमेदवारी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यासाठी भाजपाचे उच्छुक उमेदवार चंद्रशेखर कदम यांनी आपल्या उमेदवारीवर पाणी सोडल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे तीन आमदार फोडले, येत्या आठवड्याभरात राष्ट्रवादीचेही किमान तीन वरिष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच मुंडे यांनी केले. लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. परंतु, अंतर्गत गटबाजीमुळेच माझा पराभव झाल्याने आपण भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे कर्डीले यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रकाशित करण्यात आलेल्या गुन्हेगारी ने आवळला पाश..... या पुस्तकासंबंधी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष गडकरी यांनी पुस्तकात दिलेली माहिती ही राज्य सरकारकडूनच माहितीच्या अधिकाराखाली मिळविली असल्यामुळे विश्वासार्ह असल्याचे सांगितले. तर बिहारबद्दल पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती बिहार राज्य सरकारच्याच संकेतस्थळावरून मिळवल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती ही फक्त पक्षकार्यकर्ताच नव्हे तर सामान्य जनतेसाठी उपयुक्त अशी असल्याचे त्यांनी सांगितले.

वाय. सी. पवार यांनी आघाडी सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना सरकारच्या नालायकपणामुळे तसेच पोलीसांसाठीच्या बुलेटप्रुफ जाकीटांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्यामुळेच देशाला कामटे, करकरे यांच्यासारखे धडाडीचे पोलीस अधिकारी गमवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचा घणाणाती हल्लाबोलही पवार यांनी केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi