गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडेच जास्त मतदान विधानसभेसाठी झाल्यामुळे स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर होऊन सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधी भाजपा-शिवसेना युती या दोन्ही गोटांमध्ये आज मतदानानंतर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
आजच्या मतदानादरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यांनी त्रिशंकू विधानसभेचा संकेत दिलेला आहे. आणि, आघाडीला थोडी आघाडी दिली असली तरी, आघाडी व युती यांच्यातील अंतर फारच कमी असल्याने इतर छोट्या गटांच्या मदतीनेच सरकार स्थापन करण्याची पाळी येण्याची चिन्हे दिसत आहेत.
लोकसभेच्या वेळी ५६ टक्के असलेली मतदानाची टक्केवारी यावेळी ६२ पर्यंत गेली. परंतु, निवडणुकीतील चुरस पाहता ही वाढ फारच कमी असल्याचे मानले जाते. हा आकडा ६५-७० टक्क्यांवर गेला असता तर, मतदारांचा कल सरकारविरोधी असल्याचे स्पष्टपणे म्हणता आले असते. तसे न झाल्याने युतीला संधी मिळेल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.
मनसेला ब-यापैकी जागा मिळण्याच्या शक्यतेने युतीच्या जागा कमी होतील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी, रिडालोस मात्र अपेक्षेप्रमाणे फार प्रभावी ठरताना दिसला नाही. त्यामुळे सत्तारूढ आघाडीला मोठा फटका बसणार नाही, असा अंदाज आहे.
एका सर्वेक्षणाने तर आघाडीला १२५ आणि युतीला ११९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे पाहून, आजपर्यंत निर्धास्त असलेले काँग्रेसनेते आज चिंतेत पडले. तर, युतीच्या नेत्यांना अजूनही सत्तेची आशा वाटत आहे. सर्वेक्षणाचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यात नेहमीच फरक पडत असतो, असे दोन्हीकडचे नेते निदर्शनास आणून देत आहेत.
यावेळी मनसेचा विधानसभेत प्रवेश होणार, असे सर्वच सर्वेक्षणांनी मान्य केले आहे. एकाने त्यांना ८ ते १२ जागा देऊ केल्या आहेत, तर दुस-याला ही संख्या १८ वाटत आहेत. परंतु, त्यांच्या थोड्याफार जागांनीही सत्तेचा गणित इकडेतिकडे होईल, असे चित्र आजतरी दिसत आहे.
एकूण, सत्तारूढ आघाडीला शाश्वती वाटावी, अशी मतदानोत्तर सर्वेक्षणांची हमी नाही आणि युतीने एकदम निराश व्हावे, असा त्यांचा स्पष्ट इशाराही नाही. परिणामी, दोन्ही गोटांमध्ये अपेक्षेचा लंबक आशा-निराशा यांच्या दरम्यान फिरताना दिसत आहे!