कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने राज्यात सलग तिसर्यांदा सत्तेचा लगाम आपल्याच हाती राखला असून जवळपास स्पष्ट बहूमतही मिळवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कॉंग्रेसच्या खात्यात ८२ तर राष्ट्रवादीकडे ६२ जागा जमा झाल्या होत्या. साध्या बहूमतासाठी अवघ्या एका जागेची गरज आहे, ती अगदी सहजगत्या पूर्ण होईल असे दिसते आहे.
सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या आघाडी सरकारविरोधात राज्यभर कंठशोष करूनही शिवसेना-भाजप युतीला ९० जागांच्या पलीकडे मजल मारता आलेली नाही. त्यातही भाजपला शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळत आहेत. भाजपला ४६ तर शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या आहेत.
कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीत ६९ जागा मिळाल्या होत्या. यावेळी ८२ जागांवर उडी मारली आहे. त्या तुलनेत गेल्या वेळी ७१ जागा मिळविणार्या राष्ट्रवादीची घसरण झाली असून यावेळी त्यांना ६२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अर्थात ही घसरण ९ जागांचीच आहे. आतापर्यंतच्या भाकीतानुसार राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल असे वाटत होते. पण हा 'मान' उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे.
राज ठाकरे यांचा विधिमंडळ राजकारणात उदय झाला असून त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पहिल्याच विधानसभा निवडणुकीत चक्क १३ जागा मिळाल्या आहेत. तिसरी आघाडी अर्थात रिडालोसला जेमतेम दहा जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. त्यातील बहुतांश कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर आहेत.